जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन करून घोषणाबाजी करणाऱ्या पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) कार्यकर्त्यांच्या विरोधात बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. एनआयएने कोंढवा भागात केलेल्या कारवाईविरोधात पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले होते.
हेही वाचा- पुणे शहरात लहान मुले पळविणारी टोळीची अफवा; खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा
एनआयएच्या कारवाईचा निषेध
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी (२२ सप्टेंबर) कोंढवा भागात छापा टाकून पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांना अटक केली. एनआयएने देशातील विविध ठिकाणी केलेली कारवाई म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचा आरोप या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. या कारवाईच्या निषेधार्थ पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (२३ सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करण्यात आली.
हेही वाचा- पुणे : मोटारीची दुचाकीला धडक, बालिकेचा मृत्यू ; मोटारचालक संगणक अभियंता गजाआड
४१ जणांना ताब्यात घेत गुन्हा दाखल
पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली होती. परवानगी नाकारल्यानंतर पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांनी बेकायदा आंदोलन केले. जमाव जमवून घोषणाबाजी केली. बेकायदा आंदोलन करून घोषणाबाजी केल्याप्रकरणी ४१ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, असे बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सांगितले.