पुणे : पुणे विद्यार्थी गृहाचे माजी कार्याध्यक्षांसह दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. बनावट बदल अर्ज धर्मादाय आयुक्त कार्यालयात सादर करुन संस्थेचा बेकायदा घेऊन आर्थिक लाभ मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे माजी कार्याध्यक्ष रामचंद्र लक्ष्मण शेटे (वय ७४, रा. चिंतामणीनगर, बिबवेवाडी), वरुण संजय दिवाडकर (वय ३२, रा. नारायण पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राजेंद्र विठ्ठल बोऱ्हाडे (वय ५५, घाटकोपर, मुंबई) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संस्थेचे माजी कार्याध्यक्ष शेटे आणि दिवाडकर यांनी तळेगाव, नाशिक-अंजनेरी येथे संस्थेची नियामक मंडळाची सभा झाल्याचे भासविले. त्यांनी बनावट इतिवृत्त तयार केले. दिवाडकर यांनी संस्थेचे कार्यकारी मंडळ, नियामक मंडळाच्या नियुक्तीबाबत बनावट १५ बदल अर्ज, तसेट संस्थेच्या घटनेतील बदलांबाबत दोन बदल अर्ज त्यांच्या वकिलांमार्फत पुण्यातील धर्मादाय उपायुक्त कार्यालयात सादर केले.
संस्थेचा बेकायदा ताबा, तसेच आर्थिक लाभ मिळवण्यासाठी त्यांनी फसवणूक केल्याचे बोऱ्हाडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक फडतरे तपास करत आहेत.