पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) गहुंजे (ता. मावळ) भागातील अनधिकृत बांधकामप्रकरणी संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाने हा गुन्हा दाखल केला आहे.
गहुंजेमधील सर्वेक्षण क्रमांक १३८ मध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्या मीना विजय आहेर (रा. गहुंजे, ता. मावळ) यांच्याविरोधात तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पीएमआरडीए प्रशासनाकडून देण्यात आली.
हेही वाचा – वानवडीतील भैरोबानाला परिसरात नऊ वाहनांची तोडफोड; कोयते उगारुन टोळक्याची दहशत
पीएमआरडीएकडून अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी संबंधितांना वेळोवेळी नोटीशीद्वारे कळविण्यात आले होते. मात्र, त्या नोटीशीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे त्यांच्याविरोधात महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियमातील तरतुदी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळकतधारकांनी परवानगी घेऊनच बांधकामे करावीत आणि सुरू असलेली अनधिकृत बांधकमे तातडीने थांबवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा – अमोल पालेकर यांच्या कला कारकिर्दीचा ‘ऐवज’ वाचकांच्या हाती
पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डाॅ. योगेश म्हसे, पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या आदेशानुसार सहआयुक्त डाॅ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार आशा होळकर, रवींद्र रांजणे, कनिष्ठ अभियंता अभिनव लोंढे यांनी ही कार्यवाही केली.