लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: विद्यार्थ्याला स्टीलच्या छडीने मारहाण केल्या प्रकरणी कोथरुड भागातील एका खासगी शिकवणी चालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका १२ वर्षीय मुलाच्या वडिलांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदारांचा मुलगा कोथरुड भागातील भुसारी काॅलनीत खासगी शिकवणीला जातो. शिकवणीत मुलगा प्रसाधनगृहात गेला. त्या वेळी त्याच्या मित्राने प्रसाधनगृहाचा दरवाजा बाहेरून लावून घेतला. मुलाने जोरात दरवाजा वाजविला.
हेही वाचा… पिंपरी: मानसिक तणावातून विवाहित महिलेची ९ व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या
जाेरजाेरात दरवाजा वाजविल्याने शिकवणी चालक महिलेला राग आला. तिने मुलाला स्टीलच्या छडीने मारहाण केली. मारहाणीत मुलगा जखमी झाला. त्यानंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पांढरे तपास करत आहेत.