पुणे : छत्रपती संभाजीनगर नावाच्या पाटीला काळे फासून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी माजी खासदार, एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरुद्ध काेंढवा पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत महेश पांडुरंग भाेईबार (वय २८, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जलील यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १९२, १९६, १९७ (अ), २९९), ३०२, ३५१, ३५२, ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – पुणे : सायबर चोरट्यांकडून दोघांची ५७ लाखांची फसवणूक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबर राेजी सकाळी अकरा वाजता छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावरील देवळवाडी फाटा परिसरात ही घटना घडली होती. इम्तियाज जलील आणि कार्यकर्त्यांनी फेरी काढली होती. त्यावेळी समाजात तेढ निर्माण करण्यासाठी घोषणा देण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावरील नामफलकाला काळे फासण्यात आले. याबाबत भोईवार यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी तक्रार अर्जाची पडताळणी केली. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर संबंधित गुन्हा छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला.