पिंपरी : ताथवडेतील गॅस स्फोट प्रकरणी चार जणांविरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.महिपाल चौधरी (रा. पुनावळे), राहुलकुमार राजदेवराम (रा. थेरगाव), मोहम्मद रशीद मोहम्मद नसीम (रा. उत्तर प्रदेश), चंद्रकांत महादेव सपकाळ (रा. ताथवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलीस उपनिरीक्षक भारत माने यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महिपाल चौधरी आणि आरोपी राहुलकुमार या दोघांनी तिरुपती कॅरिअरच्या गॅस टँकर चालक मोहम्मद रशीद याच्याशी संगनमत करून गॅसची बेकायदेशीरपणे चोरी केली. गॅस सिलेंडरमध्ये भरताना मोठ्या प्रमाणात आग लागून स्फोट होण्याची जाणीव असताना आरोपींनी ही कृती केली. जागामालक चंद्रकांत सपकाळ यांनी नियमितपणे आपली जागा उपलब्ध करून दिली. घटनेनंतर टँकर चालक पळून गेला आहे. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.