पुणे : भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करून सहकारनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन प्रकरणी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यासह ३५ते ४० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी रवींद्र धंगेकर, नितीन कदम, सचिन देडे, अक्षय माने, साकीब आबाजी, संतोष पंडीत, अनिल सातपुते यांच्यासह ३५ ते ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलीस कर्मचारी अभिजीत बालगुडे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. धंंगेकर यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध भादंवि कलम १४३, १४५, १४९, १८८, महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम १३५, लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ चे कलम १२६ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आल आहे.
हेही वाचा – वाहनाला आकर्षक क्रमांक हवाय? आरटीओतील लिलाव प्रक्रियेविषयी जाणून घ्या
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. रविवारी (१२ मे) रात्री भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करून धंगेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्याच्या परिसरात आंदोलन सुरू केले. त्यावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते. धंगेकर यांच्या ठिय्या आंदोलनामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. जमावबंदीच्या आदेशाचा उल्लंघन केल्याप्रकरणी धंगेकर यांच्यासह ३५ ते ३० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहकानगर पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
पैसे वाटणारे मोकाट; गुन्हे आमच्यावर दाखल
पैसै वाटप होत असल्याची तक्रार घेऊन आम्ही सहकारनगर पोलीस ठाण्यात गेलो होतो. त्यावेळी तेथे भाजपचे माजी नगरसेवक आणि दोनशे ते तीनशे कार्यकर्ते होते. पैसे वाटणाऱ्यांना पोलिसांनी माेकळे सोडले. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेलचे अध्यक्ष (शरद पवार गट) नितीन कदम यांनी केला.