‘आरएसएस संघराज्य’ या नावाने खोटे खाते उघडून त्याद्वारे समाज माध्यमात, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘आरएसएस संघराज्य’ या खोट्या नावाने समाज माध्यमात लिखाण करणाऱ्या खातेधारकावर हा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत महेश संभाजी करपे (५०, रा. चंदननगर) यांनी फिर्याद दिली आहे. १४ ऑगस्ट रोजी सकाळी एका वाहिनीवर बातम्यांचे प्रसारण सुरू होते. यावेळी ‘आरएसएस संघराज्य’ या खातेधारकाने शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण केले. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्याबाबत अत्यंत बीभत्स मजकूर लिहून खोटा इतिहास प्रसारित करीत महापुरुषांची बदनामी केली, तर आरएसएस बाबत जनमानसांत गैरसमज पसरवून दोन वर्गात द्वेष भावना पसरवल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. यानुसार पोलिसांनी ‘आरएसएस संघराज्य’ या खातेधारकावर कलम १५३-अ, ४६५, ४६९, ५००, ५०५(२) सह माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सायबर पोलीस करत आहेत.

…जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट
खातेधारकाने लाइव्ह चॅट दरम्यान आक्षेपार्ह लिखाण केल्याचा स्क्रीनशॉट राष्ट्रवादीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केला होता. यामध्ये त्यांनी मुंबई पोलिसांना ‘टॅग’ करत कारवाई करण्याची मागणी केली होती. यांनतर पुण्यामध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे.