पुणे : पर्वती भागात श्वानावर गोळीबार करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच मुळशीतील पिरंगुट परिसरात एकाने पाळीव श्वानाला गळफास देऊन मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबतचे छायाचित्र समाज माध्यमात प्रसारित झाल्यानंतर पौड पोलिसांनी श्वान मालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो शेतकरी असून, त्याच्याविरुद्ध रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पौड पोलिसांनी दिली. गळफास देऊन मारून टाकलेले श्वान पिसाळलेले हाेते, असा दावा त्याच्या मालकाने पोलीस चैाकशीत केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या श्वानाच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार चौकशी करण्यात येत आहे. गळफास देऊन मारण्यात आलेल्या श्वानाचे पशुवैद्यकीय रुग्णालयात शवविच्छेदन केले जाणार आहे, अशी माहिती पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी दिली.याप्रकरणी तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गु्न्हाही दाखल केला जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक गिरीगोसावी यांनी सांगितले.

हेही वाचा >>>अजित पवार येत्या सोमवारी अर्ज दाखल करणार; बारामतीत काकापुतण्यामध्ये लढतीची शक्यता

आदित्य ठाकरे यांच्याकडून कारवाईची मागणी

श्वानाला गळफास देऊन त्याला झाडाला लटकविण्यात आल्याचे छायाचित्र समाज माध्यमात प्रसारित झाल्यानंतर शिवसेना नेते (ठाकरे गट) आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. समाज माध्यमात त्यांनी श्वानाला फास देणाऱ्याविरुद्ध कारवाईची मागणी केली.

श्वानप्रेमींकडून संताप

पर्वती परिसरात श्वान अंगावर धाऊन आल्याने त्याच्यावर गोळ्या झाडण्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर मंगळवारी श्वानाला गळफास देऊन मारण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर श्वानप्रेमींनी संताप व्यक्त केला.