पुणे : सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या आवारात ‘लव्ह जिहाद’चा आरोप करून एका विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अन्यधर्मीय तरुणीशी केलेली मैत्री तोडावी, म्हणून मारहाण करण्यात आल्याचा आरोप तरुणाने केला आहे. याबाबत तरुणाने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तक्रारदार विद्यापीठातील कौशल्य विकास केंद्राचा विद्यार्थी आहे. तो आणि त्याची मैत्रीण विद्यापीठातील उपहारगृहातून निघाले होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या चार ते पाच जणांनी विद्यार्थ्याला अडवले. आम्ही एका हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते आहोत, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थी आणि त्याच्या मैत्रिणीकडे त्यांनी आधारकार्ड मागितले. दोघांच्या धर्माबाबत त्यांनी विचारणा केली. त्यानंतर तू लव्ह जिहाद करतो का, असा आरोप करून कार्यकर्त्यांनी तरुणीला बाजूला नेले आणि लव्ह जिहादबाबत तिचे समुपदेशन केले.
हेही वाचा – खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराला अजित पवार आले, पार्थ पवार येणार?
तरुणाला धमकावून त्याच्या कुटुंबीयांच्या मोबाइल क्रमांकावर कार्यकर्त्यांनी संपर्क साधला. तुमच्या मुलाला घेऊन जा, असे त्यांनी तरुणांच्या वडिलांना सांगितले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी मला बेदम मारहाण केली. मला धमकावून वसतिगृहावर नेले. कपडे भरून निघून जा. परत येथे दिसता कामा नये, अशी धमकी कार्यकर्त्यांनी दिली, असा आरोप तरुणाने वसतिगृहप्रमुखांकडे दिलेल्या तक्रारीत केला होता. तरुणाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अजित कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.