पिंपरी- चिंचवड शहरातील राहटणी येथे राहणाऱ्या एका प्रतिष्ठित कुटुंबाने आपल्या सुनेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नामध्ये मानपान करूनदेखील मानपान केला नाही आणि पीडित दिसायला ‘सावळ्या’ असल्याने त्यांना सासरचे लोक टोमणे मारायचे.
पीडितेच्या कुटुंबाने लग्नामध्ये २५ तोळे सोन्याचे दागिने आणि लग्नात ६० लाख रुपये खर्च केला होता. असं वाकड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पती, सासू, सासरे, दीर आणि नणंद यांच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गंभीर बाब म्हणजे, पीडितेवर दबाव टाकून गर्भलिंगनिदान चाचणी केली असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे वाकड पोलिसांनी याप्रकरणी गंभीर दखल घेणे गरजेचे आहे. या घटने प्रकरणी ३५ वर्षीय पीडितेने वाकड पोलिसात तक्रार दिली आहे.
हेही वाचा – “जनता उपाशी, सरकार तुपाशी”, नाना पटोले यांचे विधान; म्हणाले, “राष्ट्रपती राजवट लावा”
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०११ मध्ये पीडित ३५ वर्षीय महिलेचा आणि रहाटणी येथील प्रतिष्ठित कुटुंबातील युवकाचा विवाह मोठ्या थाटामाटात लावून देण्यात आला. २५ तोळे सोन्याचे दागिने आणि ६० लाख रुपये खर्च लग्नासाठी पीडितेच्या आई-वडिलांनी केला होता. लग्नानंतर काही दिवसांनी पती हा मद्यपान करून गुटखा खाऊन येत असल्याचे पीडितेला समजलं. त्यामुळे अनेकदा पीडितेने आरोपी पतीला व्यसन करू नका असं सांगितलं, यावरून उलट पती, पत्नीचा मानसिक छळ करायचा. ‘तू काळी आहेस मला शोभत नाहीस’ असं म्हणून अनेकदा टोमणे मारायचा, तसेच सासू-सासरे आणि दिर हे हिनवायचे.
मद्यपान करून आलेला आरोपी पती पीडितेसोबत अनैसर्गिकरीत्या शारीरिक संबंध ठेवत असायचा. यामुळे पीडित महिला आणखीनच भयभीत झाली होती. दरम्यान, पीडित महिलेला मुलगी झाली. आम्हाला वंशाचा दिवा हवा होता. असं म्हणून सासरच्या लोकांनी पीडितेला मानसिक आणि शारीरिक छळ देण्यास सुरू केल. काही वर्षांनी पुन्हा पीडित गरोदर राहिल्या तेव्हा पीडित महिलेची सटाणा फाटा मालेगाव नाशिक या ठिकाणी डोळ्यावर पट्टी बांधून घेऊन जात गर्भलिंग निदान चाचणी करण्यात आली. त्यात मुलगा होणार असल्याचं समोर आल्यानंतर सासरचे सर्व आनंदी झाले. मात्र, प्रसुती झाल्यानंतर मुलगा हा गतिमंद झाल्याचं समजलं. त्यावरून पुन्हा पीडितेचा शारीरिक आणि मानसिक छळ सासरच्या लोकांनी केला. दीड वर्षाच्या मुलाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. दीर किरकोळ कारणावरून पीडितेसोबत वाद घालायचा. माझ्याकडे पिस्तुल आहे तुला गोळ्या घालून मारून टाकेल, अशी धमकी त्यांनी दिल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.
हेही वाचा – “भाजपाचे आमदार आमच्या संपर्कात”, अनिल देशमुखांचा दावा, म्हणाले…
या घटनेप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात पती, सासू, सासरे, नणंद आणि दीर यांच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार २०११ ते २०२२ च्या दरम्यान घडलेला आहे. या घटनेचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे या करत आहेत.