करोना कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यात उभारण्यात आलेल्या कोविड सेंटरचे काम अस्तित्वात नसलेल्या लाइफलाइन कंपनीला उद्धव ठाकरे आणि संबंधित अधिकार्यांनी दिले. त्याच दरम्यान कोविड सेंटरमध्ये उपचार घेणार्या रुग्णांचा बळीदेखील गेल्याच्या घटना घडल्या. त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि लाइफलाइन कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे केली.
या वेळी किरीट सोमय्या म्हणाले की, ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजीत पाटकर यांच्या लाइफलाइन कंपनीला करोना कालावधीत शिवाजीनगर येथे कोविड सेंटर उभारण्याचे काम देण्यात आले होते. त्या वेळी ती कंपनी अस्तित्वातही नव्हती. सर्व नियम डावलून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पीएमआरडीएच्या अधिकार्यांनी हे काम दिले होते. त्या वेळी कशा पद्धतीने बिल देण्यात आले होते. या सर्व गोष्टी वेळोवेळी सर्वांनी पाहिल्या आहेत. त्याच दरम्यान शिवाजीनगर येथील कोविड सेंटरमधील तब्बल शंभर रुग्णांचे शारीरिक नुकसान झाले आहे. काहींची किडनी खराब झाली, तर काहींना हृदयाचा त्रास सुरू झाला. तसेच त्याच दरम्यान काही रुग्णांचा बळीदेखील गेला. हे सर्व त्या कंपनीच्या कामामधील निष्काळजीपणामुळे झाल्याचे समोर आले. त्यानंतर लाइफलाइन कंपनी ही ब्लॅक लिस्ट करण्यात आली. पण त्या वेळी संबंधित कंपनीविरोधात तत्कालीन सरकारने कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा दाखल केला नाही. तरीदेखील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात लाइफलाइन कंपनीला काम दिले. एका बाजूला तीच कंपनी ब्लॅक लिस्ट होते आणि दुसर्या बाजूला काम दिले जाते. त्यामुळे सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे.
हेही वाचा – पुणे : गर्भवती पत्नीच्या पोटात लाथ मारल्याने गर्भपात; पतीविरुद्ध गुन्हा
त्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री कार्यालय, पीएमआरडीए आणि लाइफलाइन कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे केली आहे. पुढील आठ दिवसांत कारवाई न केल्यास पुन्हा पोलिसांची भेट घेणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.