पिंपरी- चिंचवड शहरातील हिंजवडीमधील अपघाताचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तब्बल वीस दिवसांनी या अपघातासंदर्भात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर हिंजवडी पोलीस खडबडून जागे झाले आणि त्यांनी अपघातात जखमी झालेल्या तरुणीच्या भावाला बोलवून तक्रार घेतली आहे. या घटनेप्रकरणी उत्कर्ष परदेशी याने फिर्याद दिली असून वाहनचालक तुषार नेमाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे- बंगळुरू महामार्गालगत भुजबळ चौकातील अपघाताचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर वायरल झाला होता. आकांक्षा परदेशी या युवतीला पाठीमागून भरधाव कारने जोरात धडक दिली होती. सुदैवाने यात तरुणी किरकोळ जखमी झाली. परंतु, तब्बल वीस दिवसानंतरही हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल का करून घेतला नाही, यासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यासंबंधी अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. अखेर हिंजवडी पोलिसांनी कारचालक तुषार नेमाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा – पिंपरी : अखेर पिंपरीतील सशुल्क वाहनतळ धोरण गुंडाळले; महापालिकेने केले ‘हे’ आवाहन
सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर पोलिसांना खडबडून जाग आल्याचे बोलले जात आहे. अपघातग्रस्त तरुणी आकांक्षाचा भाऊ उत्कर्षला बोलवून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप याप्रकरणी वाहनचालक तुषारला अटक करण्यात आली नाही. त्याचा शोध हिंजवडी पोलीस घेत आहेत. २३ मे रोजी घडलेल्या अपघातानंतर कारचालकाने मद्यपान केले होते की नाही? हे मात्र अनुत्तरितच आहे.
हेही वाचा – पिंपरी : महामेट्रोवर कृपादृष्टी, महापालिकेच्या जागेवर वक्रदृष्टी!
२३ मे रोजी गुन्हा दाखल का करण्यात आला नाही?
२३ मे रोजी अपघात घडला, त्या दिवशी आकांक्षावर उपचार करण्यासाठी तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं होतं. अपघातानंतर तरुणी घाबरली होती. त्यानंतर तरुणी आणि तिचा भाऊ हे मुंबईला निघून गेले म्हणून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नाही, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिली. परंतु, सोशल मीडियावर सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अखेर आज पोलिसांनी आकांक्षाच्या भावाला बोलवून तक्रार घेतली आहे.