पिंपरी- चिंचवडमध्ये वाढदिवसाच्या निमित्त प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन केले म्हणून आयोजकावर भोसरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गौतमी पाटील चर्चेत आली आहे. कासारवाडी येथील युवा कार्यकर्ते अमित शंकर लांडे यांचा सोमवारी वाढदिवस होता. यानिमित्त त्यांनी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रमाचे जाहीर आयोजन केले होते. सोमवारी पिंपरी- चिंचवडकरांना गौतमी पाटीलने काही भन्नाट गीतांवर ताल धरून दिलखेच अदांवर तरुण- तरुणींना घायाळ केलं. असं असताना आता कार्यक्रम होऊन गेल्यावर आयोजक म्हणजेच बर्थडे बॉयवर मात्र गुन्हा दाखल झाला आहे.
प्रसिद्ध नृत्यांगना आणि महाराष्ट्रातील तरुण- तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेल्या गौतमी पाटीलमुळे थेट आयोजकावर गुन्हा दाखल झाल्याची घटना पिंपरी- चिंचवडमध्ये घडली आहे. गौतमी पाटीलचा सोमवारी जाहीर कार्यक्रम झाला. तिने काही गाण्यांवर नृत्य करत उपस्थितांची मने जिंकली. परंतु, बर्थडे बॉय तसेच आयोजक असलेले अमित शंकर लांडे यांच्यावर परवानगी नसताना गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित केला म्हणून भोसरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस कर्मचारी दत्तात्रेय बाळासाहेब कांबळे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अमित लांडे यांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमानिमित्त पोलिसांकडे रीतसर परवानगी मागितली होती. परंतु, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून भोसरी पोलिसांनी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमासाठीची परवानगी नाकारली. तरी देखील आयोजक अमित लांडे यांनी सोमवारी गौतमी पाटीलचा जाहीर कार्यक्रम घेतला म्हणून आता थेट आयोजक असलेल्या बिर्थडे बॉयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.