पिंपरी-चिंचवडमध्ये पगार मागितल्यामुळे दुकान चालकाने साफसफाई करणाऱ्या महिलेला बेदम मारहाण केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, निगडी पोलिसांनी मात्र अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. यामुळे पोलिसांविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. निगडी पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
हर्षद खान असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. त्याला निगडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, पीडित महिलेला आम्ही सहकार्य करू, अशी प्रतिक्रिया निगडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांनी लोकसत्ता ऑनलाइनला दिली.
हेही वाचा – सायबर हल्ले, जंगलातील वणवे रोखण्यासाठी प्रणाली विकसित; सी-डॅककडून निर्मिती
मिळालेल्या माहितीनुसार, ४२ वर्षीय महिला सिटी प्राईड इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असणाऱ्या ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये साफसफाईचे काम करते. परंतु, ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या हर्षद खान याने गेल्या तीन महिन्यांपासून महिलेचा पगार दिलेला नाही. पीडित महिलेने अनेकदा त्याच्याकडे पगाराची मागणी केली. आज-उद्या असे म्हणून पगार देण्यास तो टाळाटाळ करत होता. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास महिलेने हर्षद खानकडे पगार मागितला. यावरून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. रागात असलेल्या आरोपी हर्षदने ४२ वर्षीय महिलेला अश्लील शिवीगाळ करत बुक्क्यांनी तोंडावर बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिला जखमी झाली असून तिच्या तोंडातून रक्तस्त्राव झाल्याचे सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळत आहे.
ही घटना गंभीर असतानादेखील निगडी पोलिसांनी मात्र अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. यामुळे निगडी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. या घटनेकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष देऊन त्या महिलेला न्याय देतात का, हे पाहावे लागणार आहे.