रेडिमेड कापड विक्री व्यवसायिकाला दहा हजार रुपये हप्ता मागणाऱ्या गुंडाला पिंपरीच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. महिन्याला दहा हजार रुपये द्या नाहीतर तुमच्यासह दुकान जाळण्याची धमकी तक्रारदार यांना आरोपी माधव वाघमारे आणि अतिश शिरसाट यांनी दिली होती. या प्रकरणी पिंपरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून खंडणी विरोधी पथकाने वाघमारेला जेरबंद केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात पिंपरी बाजार पेठेतील रेडिमेड कापड विक्री करणाऱ्या व्यवसायिकाला जीवे मारण्याची धमकी देऊन दहा हजार रुपये हप्ता मागितल्याची घटना घडली. आरोपी माधव वाघमारे आणि अतिश शिरसाट हे दोघे तक्रारदार यांच्या दुकानात जाऊन त्यांना धमकावले. शिवीगाळ करून दुकान चालवायचे असल्यास महिन्याला दहा हजार हप्ता द्यावा लागेल. तो न दिल्यास दुकानासह तुम्हाला जाळून टाकेल अशी धमकी दिली होती. अस म्हणून त्याने दुकानातील पाचशे रुपये खंडणी घेतली. तर, शिरसाट याने तक्रारदार यांच्या वडिलांना मारहाण करून तुकानातील तीन शर्ट घेतले होते. घटनेनंतर तक्रारदार यांनी खंडणी विरोधी पथकाकडे धाव घेतली होती. खंडणी विरोधी पथकाने माधव वाघमारेला अटक केली असून दुसरा आरोपी फरार आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. ही कारवाई अरविंद पवार यांच्या टीम ने केली आहे.