पुणे: ऑनलाइन गेमच्या माध्यमातून एका अल्पवयीन मुलीशी मैत्री करून तिला धमकावणाऱ्या महाविद्यालयीन तरुणास मार्केट यार्ड पोलिसांनी बिहारमधून अटक केली.
अमनकुमार पंकज तांटी (वय २०, रा. हरपूर, जि. बेगुसराई, बिहार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अल्पवयीन मुलगी फ्री फायर ऑनलाइन गेम खेळत असताना तिची आरोपी अमनकुमार याच्याशी ओळख झाली. ऑनलाइन गेमच्या माध्यमातून अमनकुमारने तिला जाळ्यात ओढले. एके दिवशी अल्पवयीन मुलीला धमकावून तिची छायाचित्रे मागवून घेतली. मुलीने त्याला छायाचित्रे पाठविल्यानंतर त्याने तिला धमकावण्यास सुरुवात केली. त्याच्या त्रासामुळे अखेर मुलीने पोलिसांकडे तक्रार दिली. बालकांचे लैंंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा… अन्न आणि औषध प्रशासनाने पकडला लाखो रुपयांचा गुटखा
पोलिसांनी तपास सुरू केला. तेव्हा आरोपी अमनकुमार चार मोबाइल क्रमांक वापरत असल्याचे आढळून आले. त्याच्या पत्ताही पोलिसांना मिळाला नव्हता. तांत्रिक तपासात आरोपी बिहारमधील असल्याचे समजले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट यार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुरेशसिंग गौड, गु्न्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, किशोर पोटे, अमित जाधव, धनश्री गोफणे यांचे पथक बिहारमध्ये पोहोचले. पोलिसांनी वेशांतर करून आरोपी अमनकुमारला ताब्यात घेतले. कारवाईसाठी बिहार पोलिसांनी सहाय केले.अमनकुमार एका महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अमनकुमारला अटक करण्यात आली आहे.