पुणे : डाव्या विचारसरणी ही दंभ, दर्प आणि अहंकारावर आधारीत आहे. विचार प्रसारासाठी त्यांच्याकडे परिसंस्था आहे. चुकीची मांडणी या विचारधारेकडून होत असल्याने त्याला रोखण्यासाठी सजग राजकीय भूमिका घ्यावी लागणार आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांनी येथे रविवारी व्यक्त केले. डाव्या विचारसरणीला रोखण्याची क्षमता भारत देशात आहे. हा देश सत्याचा असून धर्मावर चालणारा आहे. त्यामुळे डाव्या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करेल, असेही भागवत यांनी सांगितले.
दिलपराज प्रकाशनाच्या वतीने अभिजित जोग लिखित ‘जगभराला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाचे प्रकाशन डाॅ. मोहन भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू डाॅ. शांतीश्री पंडीत, प्रकाशक राजीव बर्वे, अभिजीत जोग यावेळी उपस्थित होते. डाव्या विचारांचे चेहरे वेगळे आहेत, मात्र आसुरी प्रवृत्ती कायम आहे. त्यामुळे प्रतिकार, प्रबोधन, संशोधन आणि योग्य आचारण या मार्गाने ही विखारी, विषारी प्रवृत्ती रोखता येईल, असे भागवत यांनी सांगितले.
ते म्हणाले की, मूळात ही विचारणी पाश्चिमात्य आहे. दंभ, दर्प, अहंकारावर ती आधारीत आहे. मीच बलवान आहे, संशोधक आहे, विचारधन आहे, अशी मांडणी या विचारसरणीकडून केली जाते. चुकीच्या विचारांची मांडणी करून ते पोहोचविण्यासाठी आवश्यक परिसंस्था त्यांच्याकडे आहे. विचारसरणीला झुंडशाही करायची आहे मात्र लोकशाही मानली जाते, असे ते भासवितात. मुक्त विचार स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांच्याकडून दडपशाही होते, हे वास्तव आहे. देश, धर्म आणि राष्ट्रानंतर आता ही विचारसरणी कुटुंबव्यवस्था पोखरत आहे.
या चुकीच्या विचारसरणीला तोंड देण्यासाठी त्यांचा बुरखा फाडावा लागणार आहे. ती क्षमता भारत देशात आहे. त्यासाठी प्रतिकार करावा लागणार आहे. भारत देश सत्यावर चालणारा आहे. धर्म मानणारा आहे. धर्माची तत्वे जगात सर्वश्रेष्ठ आहेत. त्यामुळे प्रतिकार, प्रबोधन, संशोधन आणि आचरण यावरच या विचारसरणीला रोखणे शक्य होणार आहे. भारत देशात ही क्षमता असल्याने या विचारसरणीची उत्तरक्रिया भारताकडूनच होईल, असे भागवत यांनी स्पष्ट केले. धर्माचा, संस्कृतीचा अभिमान बाळगला पाहिजे. डाव्या विचारसरणीच्या परिसंस्थेला रोखण्याचे सामर्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेत आहे, शांतीश्री पंडीत यांनी सांगितले. अभिजित जोग यांनी पुस्तकाची माहिती दिली. राजीव बर्वे यांनी प्रास्ताविक केले. मधुमिता बर्वे यांनी आभार मानले.