हडपसर भागात दहशत माजविणाऱ्या सुजीत वर्मा टोळीतील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेने सातारा परिसरातून अटक केली. गेल्या काही महिन्यांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. राजकिरण उर्फ ओमस्या गणेश भंडारी (वय २२, रा. गंगानगर, फुरसुंगी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
हेही वाचा- मुंबईत आणखी तीन दिवस थंडीचा मुक्काम; उत्तरेकडील थंडीच्या लाटेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला हुडहुडी
हडपसर भागात कोयता गँगने दहशत माजविली होती. गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने हडपसर भागातील कोयता गॅंगचा म्होरक्या बिट्या कुचेकर याच्यासह साथीदारांना नुकतीच अटक केली होती. तसेच दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. सराईत गुन्हेगार भंडारी सातारा जिल्ह्यातील नाझिरे गावात असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानुसार पथकाने सापळा लावून त्याला नझिरे गावातून ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल आणि पथकाने ही कारवाई केली.