पुणे : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एका अभ्यासिकेला लागलेल्या आगीनंतर अभ्यासिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मध्यवर्ती भागातील अभ्यासिकांची तपासणी करून संबंधितांमध्ये जनजागृती करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. त्यासाठी अग्निशमन दल आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे सदाशिव पेठेतील अभ्यासिकांची तपासणी करत त्यातील काहींना नोटिसा बजाविल्या आहेत. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी ही माहिती दिली.

गेल्या आठवड्यात नवी पेठेतील एका इमारतीत सुरू असलेल्या यूपीएससी आणि एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासिकेला आग लागली होती. येथे असलेली पुस्तके, वह्या आणि फर्निचरमुळे ही आग अधिक वेगाने पसरली. अग्निशामक दलाने वेळेत आग आटोक्यात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. या घटनेची आता महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. या अभ्यासिकांची तपासणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

हेही वाचा >>>पुणे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा! केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाचा पुणे महापालिकेला पुरस्कार

शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या सदाशिव पेठ, नवी पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ या भागांत अनेक अभ्यासिका आहेत. स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेले अनेक उमेदवार या अभ्यासिकांमध्ये आपली तयारी करतात. काही व्यक्तींनी आपल्या मालकीच्या इमारतीमध्ये अशा अभ्यासिका सुरू केलेल्या आहेत. यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक गोष्टींचे पालन देखील काही ठिकाणी केले जात नाही. या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर या अभ्यासिकांची तपासणी करून तेथे कोणत्या गोष्टी असणे आवश्यक आहे, हे सांगण्यासाठी पालिकेने हे पाऊल उचलले आहे.

हेही वाचा >>>शहरातील अभ्यासिकांची तपासणी करण्याचा मोठा निर्णय, नक्की कारण काय ? महापालिका आयुक्तांचा अग्निशमन दलाला आदेश

शहरातील ज्या इमारतींमध्ये अभ्यासिका तसेच वसतिगृह सुरू आहेत. तेथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशमन यंत्रणा व अन्य कोणत्या सुविधा उपलब्ध आहेत का? याची तपासणी केली जाणार आहे. संबंधितांमध्ये जनजागृती करण्यासाठी महापालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाने संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. अभ्यासिकांसाठी निवासी जागेचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास तेथे व्यावसायिक कर आकारणी करण्याच्या सूचना देखील पालिकेच्या मिळकत कर विभागाला देण्यात आल्याचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.

विद्यार्थांच्या सुरक्षिततेसाठी अभ्यासिकांमध्ये काय काळजी घेतली जाते हे पाहण्याचे आदेश अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार तपासणी केली जाईल. अभ्यासिकांच्या त्रासाबाबत काही नागरिकांच्या तक्रारी आहेत. त्यावर देखील चर्चा केली जाणार आहे.- डॉ. राजेंद्र भोसले, महापालिका आयुक्त