पुणे : ससून सर्वोपचार रुग्णालयातील अधीक्षकपुराण संपत नसल्याचे पुन्हा समोर आले आहे. गेल्या वर्षभरात पाच अधीक्षक नेमण्याचा विक्रम रुग्णालयाच्या नावावर नोंद असताना आता नवीन अधीक्षकांच्या नियुक्तीला आक्षेप घेण्यात आला आहे. अधीक्षक डॉ. यल्लाप्पा जाधव हे पदासाठी पात्र नाहीत, असे गोपनीय पत्र अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी वैद्यकीय शिक्षण आयुक्तांना पाठविले आहे. यामुळे अधीक्षकपदाचा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.
ससूनच्या अधीक्षकपदी डॉ. यल्लाप्पा जाधव यांची नियुक्ती करावी, असे आदेश वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांनी दिले होते. त्यानंतर डॉ. जाधव यांनी अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला. त्याचवेळी आधीचे अधीक्षक डॉ. अजय तावरे यांनी याला विरोध केला होता. अधिष्ठात्यांनी पदभार सोडण्याचे आदेश दिले नाहीत, असे कारण त्यांनी पुढे केले. अखेर अधिष्ठात्यांनी २२ एप्रिलला आदेश काढल्यानंतर डॉ. तावरे यांनी अधीक्षकपदाचा कार्यभार डॉ. जाधव यांच्याकडे सोपविला.
हेही वाचा – पुणे : आईच्या शस्त्रक्रियेसाठी शेजाऱ्याचे घर फोडले
विशेष म्हणजे, अधिष्ठाता डॉ. काळे यांनी २२ एप्रिललाच वैद्यकीय आयुक्तांना गोपनीय पत्र लिहिले आहे. या पत्रात डॉ. जाधव हे वैद्यकीय अधीक्षकपदाचे निकष पूर्ण करीत नाहीत, असा आक्षेप घेण्यात आला आहे. पत्रात म्हटले आहे की, भारतीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांची संस्थेत पूर्तता करण्यात येत आहे. नजीकच्या काळात पदवीपूर्व आणि पदव्युत्तर प्रशिक्षणासाठी आयोगामार्फत निरीक्षण होणार आहे. आयोगाच्या मानकांनुसार महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयाच्या अधीक्षकपदासाठी पाच वर्षे प्राध्यापकपदाचा अनुभव आवश्यक आहे. डॉ. यल्लाप्पा जाधव हे सहयोगी प्राध्यापक असून, त्यांच्याकडे प्राध्यापकपदाचा अनुभव नाही. त्यामुळे त्यांची नियुक्ती अडचणीची ठरू शकते.
आधीच्या प्रकरणांवर रोख
गेल्या काही वर्षांपूर्वी वैद्यकीय उपअधीक्षकपद डॉ. जाधव यांच्याकडे सोपविण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या विरोधात महिला सुरक्षारक्षकाने तक्रार केली होती. त्या प्रकरणात डॉ. जाधव यांची चौकशी होऊन समजही दिली होती. त्यानंतर त्यांना या पदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर गेल्या वर्षी त्यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षकपदाची जबाबदारी होती. त्या वेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अधीक्षक कार्यालयातील एका कर्मचाऱ्यावर कारवाई झाली होती. त्यानंतर डॉ. जाधव यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आला होता, हे मुद्दे पत्रात मांडण्यात आले आहेत.