पुणे: महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून न-हे आंबेगाव येथे साकारत असलेल्या शिवसृष्टीच्या पुढील टप्प्याच्या उभारणीसाठी गुजरात सरकारकडून पाच कोटी रुपयांची देणगी गुरुवारी सुपूर्त करण्यात आली.
महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त विनीत कुबेर यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांकडून मुख्यमंत्री निवासस्थानी विशेष निमंत्रितांच्या उपस्थितीत धनादेशाच्या स्वरूपात ही देणगी स्वीकारली. गुजरातचे वन व पर्यटन मंत्री मुलु बेरा, पर्यटन सचिव सौरभ पारधी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संदीप जाधव या वेळी उपस्थित होते.
हेही वाचा… पुण्यातील आभासी चलन फसवणूक प्रकरणाची सुनावणी आता दिल्लीतील विशेष न्यायालयात
कुबेर म्हणाले, की शिवसृष्टीच्या रुपाने महाराष्ट्रात साकारत असलेल्या ऐतिहासिक थीम पार्कला मदत करण्याची इच्छा गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पाच कोटी रुपयांचा धनादेश प्रतिष्ठानला सुपूर्त करण्यात आला. मुख्यमंत्री पटेल यांना शिवसृष्टीची संपूर्ण माहिती देत या ठिकाणी त्यांनी नक्की भेट द्यावी असे आग्रहाचे निमंत्रण प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना देण्यात आले.
या देणगीचा उपयोग शिवसृष्टीच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी करण्यात येणार असून यामध्ये प्रतापगडावरील भवानीमाता मंदिराबरोबरच रंगमंडल, गंगासागर तसेच गेल्या ३५० वर्षांत शिवछत्रपतींच्या कल्पनेतील स्वराज्य संकल्पनेच्या दिशेने झालेली वाटचाल, मंदिरांचा जीर्णोद्धार, स्वभाषा, स्वधर्म या विषयात पुढील पिढ्यांनी केलेले कार्य याची माहिती देणारे दालन यांचा समावेश असेल. याबरोबरच छत्रपतींच्या राजसभेची निर्मिती पूर्ण करण्याचाही प्रतिष्ठानचा प्रयत्न राहील, अशी माहिती कुबेर यांनी दिली.