पुणे : चार-पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर शहरात गुरुवारी सकाळपासून पावसाला सुरुवात झाली. शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही पाऊस पडला. दिवसभरात ११.५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. दरम्यान, पुढील चार दिवस शहरात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

सोमवारपासून मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली होती. बुधवारी रात्री ढगाळ वातावरण निर्माण होऊन हलक्या पावसाचा शिडकावा झाला होता. मात्र, गुरुवारी सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. मध्यवर्ती पेठांसह वडगाव, धायरी, हडपसर, कोथरूड, वानवडी, औंध, सातारा रस्ता अशा सर्वच भागात पाऊस पडला. र्निबध शिथिल झाल्याने कामासाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांची मध्यम स्वरूपाच्या पावसाने तारांबळ उडवली. महापालिके कडून रस्ते, मलनिस्सारण व जलवाहिन्यांच्या कामांमुळे रस्ते खोदाई के ली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूककोंडी झाल्याचे चित्र होते.

दरम्यान, पुढील चार दिवस शहरात आकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील घाटमाथा परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Story img Loader