पुणे: श्वेत त्वचा (कोड) असलेल्या व्यक्तींकडे समाज नेहमी वेगळ्या नजरेने पाहत असतो. अशा व्यक्तींना जगण्याचा आत्मविश्वास देण्यासाठी आणि त्यांच्यात कोणतीही कमतरता नाही, हे समाजाला दाखूवन देण्यासाठी एका अनोख्या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले. जागतिक व्हिटिलिगो (त्वचारोग) दिनानिमित्त आयोजित या फॅशन शोमध्ये ‘ते आले, त्यांनी पाहिलं, त्यांनी जिंकलं’, असेच चित्र दिसून आले.

श्वेता असोसिएशनच्या “कॅनव्हास ऑफ नेचर” हा फॅशन शो आयोजित करण्यात आला. जागतिक त्वचारोग दिन २५ जून रोजी साजरा केला जातो. यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्वेता असोसिएशनच्या संस्थापिका डॉ. माया तुळपुळे या कार्यक्रमाच्या संयोजक होत्या. त्वचारोगग्रस्त व्यक्तींना आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी श्वेता ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. या माध्यमातून डॉ. माया तुळपुळे या दोन दशकांहून अधिक काळ श्वेत त्वचा असलेल्या समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करीत आहेत.

हेही वाचा >>>‘एल थ्री’ बारमधील पार्टीत मुंबईतून मेफेड्रोनचा पुरवठा; संगणक अभियंता तरुणासह दोघे अटकेत

संस्थेने या वेळी एका फॅशन शोच्या माध्यमातून श्वेत त्वचा असलेल्या व्यक्तींना एक मंच उपलब्ध करून दिला. श्वेत त्वचा असलेल्या व्यक्ती इतरांपेक्षा वेगळे नसतात. त्यांना समाजातील इतर घटकांप्रमाणे सन्मानाने वागवले पाहिजे, असा संदेश या फॅशन शोमधून देण्यात आला. या फॅशन शोमध्ये श्वेत त्वचा असलेले एकूण २३ जण सहभागी होते. फॅशन शोचे दिग्दर्शन चैतन्य गोखले यांनी केले होते. लीना खांडेकर यांच्याकडून सहभागींची रंगभूषा आणि केशभूषा करण्यात आली. या कार्यक्रमास स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या (सॉफ्ट) प्राचार्या डॉ. गरिमा भल्ला यांनी विशेष सहकार्य केले. सॉफ्टच्या विद्यार्थिनींनी सहभागींसाठी नैसर्गिक तत्वांवर आधारित विविध कल्पना वापरून आकर्षक पोशाख बनविले.