पुणे : फर्ग्युसन रस्त्यावर ग्राहकांवरून दोन दुकानातील कामगारांमध्ये हाणामारी झाली. भररस्त्यात झालेल्या हाणामारीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कामगारांना ताब्यात घेतले. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी चौघांना अटक केली.
महेश मारुती नायक (वय २४, रा. वारजे), सूरज श्रीकांत कालगुडे (वय २१, रा. जनवाडी), अमित निलेश देशपांडे (वय २६, रा. नारायण पेठ), विशाल नरेश उर्किडे (वय २१, रा. तळजाई वसाहत, पद्मामवती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक तुषार आल्हाट यांनी या संदर्भात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फर्ग्युसन रस्त्यावर छोट्या गल्लीत फेरीवाले व्यवसाय करतात. या परिसरात कपडे, पादत्राणे विक्रीची दुकाने आहेत. या दुकानातील कामगारांमध्ये ग्राहकांवरुन वाद झाला होता. त्यांना पोलिसांनी समज दिली होती. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास ग्राहक दुकानात नेण्यावरुन कामगारांमध्ये वाद झाला. कामगारांमध्ये भररस्त्यात हाणामारी सुरू झाली. त्या वेळी पोलीस कर्मचारी तुषार आल्हाट, विशाल साडेकर गस्त घालत होते. त्यांनी भररस्त्यात सुरू असलेल्या हाणामारीचा प्रकार पाहिला. पोलीस कर्मचारी आल्हाट आणि साडेकर यांनी हाणामारी करणाऱ्या कामगारांना पकडले. त्यांच्या बरोबर असलेले कामगार पसार झाले.
हेही वाचा >>> पुणे : बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षकाची महिलेला धमकी
ग्राहकांना आकर्षिक करून घेण्यावरून वाद
फर्ग्युसन रस्त्यावर पदपथावर फेरीवाल्याने कपडे विक्रीची दुकाने थाटली आहेत. शेजारी असलेल्या गल्लीत दुकाने आहेत. ग्राहकांना आकर्षिक करून घेण्यावरून या पूर्वी वाद झाले होते. फेरीवाल्यांमुळे नागरिकांना पदपथावरुन चालता देखील येत नाही.