पिंपरी : कंपनीतील भंगार घेण्यावरुन झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी मित्राचे अपहरण करुन जंगलात नेऊन मित्राचा खून करणाऱ्या दोघांना चिखली पोलिसांनी अटक केली. सैफुद्दीन खान, मोहम्मद अनिस अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सिराज अबुल हसन खान (रा.कुदळवाडी) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत सिराजचे चुलते मिजाज अहमद अब्दुल खान यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सिराज आणि आरोपी सैफुद्दीन दोघे मित्र होते. दोघांचाही भंगाराचा व्यवसाय होता. दोन महिन्यांपूर्वी सिराज आणि सैफुद्दीन यांच्यामध्ये कंपनीचे भंगार घेण्यावरुन वाद झाला होता. त्यावेळी सिराजने कुदळवाडी परिसरात राहणाऱ्या मुलांना सैफुद्दीनला मारहाण करण्यासाठी पाठविले होते. त्यामुळे भविष्यात जिवाला धोका होऊ शकतो, या भीतीने सैफुद्दीनने मुंबईत राहणारा मित्र मोहम्मदला बोलावून घेतले. २८ सप्टेंबर रोजी सिराजला भंगार घेण्याचे खोटे कारण सांगून दुचाकीवरुन चऱ्होलीकडे संरक्षण विभागाच्या जंगलात घेऊन गेले. तिथे डोक्यात हातोडीने घाव करुन सिराजचा खून केला.
हेही वाचा – पुणे : येरवडा कारागृहात गुंडाकडून पोलीस शिपायावर हल्ला
हेही वाचा – ‘सिटी टास्क फोर्स’ कागदावरच, राज्य शासनाकडून महापालिकेला स्मरणपत्र
मृतदेह जंगलात टाकल्याची कबुली आरोपींनी दिली. उत्तरप्रदेशला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या मोहम्मद याला मुंबईतून अटक केली. सतत पडणाऱ्या पाऊस, दलदल यामुळे मृतदेह कुजला होता. परिसरात दुर्गंधी सुटली होती. कपड्यावरून सिरजाचा मृतदेह असल्याचे पोलिसांनी ओळखले.