पुणे : नामांकित इंधन कंपनीच्या टँकरमधून इंधन चोरी करणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून २४ हजार लिटर इंधन, आठ टँकर असा दोन कोटी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शिर्डी विमानतळाकडे निघालेल्या टँकरमधून इंधन चोरी हाेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करून पाचजणांना ताब्यात घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुनिलकुमार प्राणनाथ यादव (वय २४ रा. हडपसर, मूळ रा. प्रतापगढ, लालगंज, उत्तरप्रदेश), दाजीराम लक्ष्मण काळेल (वय ३७ मूळ रा. वळई ता. माण, सातारा ), सचिन रामदास तांबे (वय ४० रा. हडपसर), शास्त्री कवलु सरोज (वय ४८ रा.हडपसर), सुनिल रामदास तांबे (वय ३८ रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. हडपसर भागात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी पोलीस कर्मचारी मनोज सुरवसे यांना इंधन चोरट्यांच्या टोळीची माहिती मिळाली.

हेही वाचा – जुन्नरमधील विविध कार्यकारी सोसासयटीचे संचालक किशोर तांबे यांचा खून; दोघे गजाआड

नवी मुंबईतील वाशी येथून एटीफ पेट्रोल (विमानासाठी वापरण्यात येणारे पेट्रोल) तसेच डिझेल भरून टँकर शिर्डी विमानतळाकडे निघाले होते. इंधन कंपनीकडून प्रवासाचा मार्ग निश्चित करण्यात आला होता, तसेच टँकरमध्ये विशिष्ट यंत्रणा (ॲटोलाॅक) बसविण्यात आली होती. आरोपींकडून इंधन चोरी होत असल्यची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने हडपसर परिसरात छापा टाकला. आरोपी टँकरमधून इंधन चोरी करत असल्याचे आढळून आले. तेथून इंधन भरलेले दोन टँकर, आठ रिकामे टँकर, १४ प्लास्टिक कॅन असा दोन कोटी २८ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. या घटनेची माहिती इंधन कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. इंधन कंपनीतील अधिकारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.

हेही वाचा – उत्तरप्रदेशातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून पुण्यात तिघांवर खुनी हल्ला

पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदिप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा, सहायक आयुक्त बजरंग देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिगंबर शिंदे, विश्वास डगळे, सहायक निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक अविनाश शिंदे आदींनी ही कारवाई केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A gang of thieves stealing airplane fuel arrested pune print news rbk 25 ssb
Show comments