स्वारगेट एसटी स्थानक परिसरात प्रवाशांना धमकावून लुटणारी चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने पकडले. चोरट्यांकडून तीन दुचाकी, मोबाइल संच, मिरची पूड, गज असा दोन लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अक्षय किशाेर शिंदे (वय २८, रा. केशवनगर, मुुंढवा), सतीश दशरथ साळुंखे (वय ५०, रा. रासकर मळा), अनिल शंकर जाधव (वय ४०) आणि संदिप बाबुलाल काेरी (वय २७, रा. पर्वती दर्शन) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत.
हेही वाचा- पुणे : पीएमपी बस चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने प्रवासी तरुणी जखमी
स्वारगेट एसटी स्थानक परिसरात प्रवाशांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांची टोळी थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने स्वारगेट परिसरातील कालव्याजवळ सापळा लावला. पोलिसांच्या पथकाने शिंदे, साळुंखे, जाधव, कोरी यांना पकडले. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट दोनचे पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, सहायक निरीक्षक वैशाली भोसले, उपनिरीक्षक नितीन कांबळे, राजेंद्र पाटोळे, शंकर नेवसे, संजय जाधव, कादीर शेख आदींनी ही कारवाई केली.