पुणे : खंडणीसाठी एका डाॅक्टरचे अपहरण करून पसार झालेल्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. डाॅक्टरच्या नियोजित पत्नीच्या भावजयीने अपहरणाचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी डाॅक्टरचे अपहरण करणाऱ्या आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून १२ लाखांची रोकड, मोबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
माऊली उर्फ ज्ञानदेव महादेव क्षीरसागर, राहुल दत्तू निकम (वय २७), नितीन बाळू जाधव (वय २५), संतोष धोंडीबा गोंजारी उर्फ राणी पाटील (वय ३४, चौघे रा. इंदापूर, जि. पुणे), सुहास साधू मारकड (वय २८), विद्या नितीन खळदकर (वय ३५, रा. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ९ ऑगस्ट रोजी वडकी भागात ही घटना घडली होती.
हेही वाचा – प्रवाशांसाठी खुशखबर! बार्शी, शेगावसह ‘या’ स्थानकांवर रेल्वे गाड्यांना थांबा
फिर्यादी डॉक्टर पशुवैद्यकीय तज्ज्ञ आहे. डाॅक्टर आणि त्याच्या पत्नीत कौटुंबिक वाद झाला होता. त्यांनी न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. पोटगीपोटी पत्नीला २० लाख रुपये देण्याबाबतचा आदेश न्यायालयाने दिला होता. त्यामुळे डाॅक्टरने २० लाखांची रक्कम घरात ठेवली होती. दरम्यान, डाॅक्टरचे एका महिलेशी प्रेमसंबंध जुळले होते. दोघे विवाह न करता एकत्र राहत होते. दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर डाॅक्टरची नियोजित पत्नी ९ ऑगस्ट रोजी सोलापूर येथे माहेरी गेली होती. तेथे भावजय विद्या खळदकरला डाॅक्टरच्या घरात मोठी रक्कम असल्याची माहिती समजली. विद्याने साथीदारांच्या मदतीने डाॅक्टरला लुटण्याचा कट रचला. त्यानंतर संतोष धोंडीबा गोंजारी उर्फ राणी पाटील या तृतीयपंथीय व्यक्तीने डाॅक्टरला श्वान आजारी असल्याबाबत दूरध्वनी केला. डाॅक्टरला उपचाराच्या बहाण्याने सासवड रस्त्यावरील वडकी नाला येथे बोलावून घेतले. त्यानंतर तेथे दबा धरून बसलेल्या आरोपींनी डॉक्टरला चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. डॉक्टरच्या घराचा पत्ता विचारून घेतला. मोबाइल आणि घराच्या चाव्या जबरदस्तीने घेतल्या. त्यानंतर घरातील २ लाख १० हजार रुपये किंमतीचे सात तोळे सोन्याचे दागिने आणि २५ लाख रुपयांची रोकड असा २७ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लुटूनआरोपी पसार झाले होते.
हेही वाचा – रेल्वे प्रशासन अखेर हलले! आपत्कालीन वैद्यकीय कक्ष पूर्वनियोजित जागीच
लोणी काळभोर पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करून आरोपींना अटक केली. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक पोलीस आयुक्त आश्विनी राख, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, गुन्हे निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे आणि पथकाने ही कामगिरी केली.