पुणे : महावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस परिसरात पकडण्यात आले. चोरट्यांकडून देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस, मोटार, कोयता असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दत्ता अशोक शिंदे (वय २८, रा. राहू, ता. दौंड, जि. पुणे), सचिन लक्ष्मण भोसले (वय ३९, रा. आष्टी, जि. बीड), सचिन अशोक बेलदार (वय २१, रा. येवला, जि. नाशिक), मल्हार अंबादास अडागळे (वय २४, रा. रवळगाव, जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस परिसरात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी चोरट्यांची टोळी मोटारीतून येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून चौघांना पकडले. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार मामा रिकिबे (रा. कुर्डुवाडी, जि. सोलापूर) पसार झाला. पोलिसांनी चोरट्यांकडून मोटार, देशी बनावटीचे पिस्तूल, काडतूस, कोयता असा साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
चोरट्यांनी शिरुर, यवत, तसेच मिरजगाव परिसरात महावितरणच्या राेहित्राची तोडफोड करुन तांब्याच्या तारा चोरुन नेल्याची कबुली दिली. यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे, उपनिरीक्षक मीरा मटाले, संजय नागरगोजे, हवालदार संजय देवकाते, नीलेश कदम, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, रामदास जाधव आदींनी ही कारवाई केली.