ग्रामीण भागात शेतातील मोटारपंपांना वीज पुरवठा करणाऱ्या रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेने गजाआड केले. चोरट्यांनी नगर रस्त्यावरील लोणीकंद तसेच सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात महावितरणच्या रोहित्राची तोडफोड करून तांब्याच्या तारा चोरण्याचे १२ गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

हेही वाचा >>> पुणे : चांदणी चौकातील वाहतूक रात्री अडीच तास बंद

अजय मांगीलाल काळे (वय २५, रा. इनामगाव, ता. शिरुर, जि. पुणे), रोहित रामदास वाजे (वय २७, रा. मानस अपार्टमेंट, मोशी), वसिष्ठ श्रीमंत मुंढे (वय २१, रा. केसनंद, वाघोली रस्ता), कुमार नामदेव शेलार (वय २२, रा. द्वारिका निवास, काळूबाईनगर, वाघोली), सूरज भैरवनाथ चौगुले (वय २३, रा. आव्हाळवाडी, मूळ रा. वडगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर), सुनील कोळप्पा विटकर (वय ३४, रा. वाघोली, मूळ रा. मार्डी, जि. सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. नगर रस्त्यावरील लोणीकंद आणि सोलापूर रस्त्यावरील लोणी काळभोर परिसरात शेतातील मोटारपंपांना वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या रोहित्रांची तोडफोड करून तांब्याच्या तारा तसेच ऑईल लांबविण्यात आल्याच्या घटना वाढीस लागल्या होत्या.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील युनिट सहाकडून तपास करण्यात येत होता. चोरटे वाघोलीतील जाधव वस्ती परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून पोलिसांनी सहा जणांना पकडले. तपासात रोहित्रातील तारा तसेच ऑईल आरोपी सुनील विटकरला विकल्याची माहिती उघड झाली. पोलिसांनी विटकरला ताब्यात घेतले. चोरट्यांकडून दोन लाख ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरेश जायभाय, भैरवनाथ शेळके, मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, प्रतीक लाहिगुडे आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader