पुणे: मोक्का कारवाईनंतर पसार झालेला कात्रजमधील चुहा गँगमधील गुंडाला पोलिसांनी पकडले. गुंड आईला भेटण्यासाठी कात्रज परिसरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले.
तौफिक लाला शेख (वय २६ रा. मांगडेवाडी, कात्रज) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, लूट, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. शेखसह साथीदारांविरुद्ध पोलिसांनी वर्षभरापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली होती. कारवाई केल्यानंतर शेख पसार झाला होता. गेले वर्षभर तो वेगवेगळ्या भागात वास्तव्यास होता. परगावात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा लावला होता.
हेही वाचा… देशात कोळशाचा धूर… बातमी आनंदाची की, संकटांना आमंत्रण देणारी?
मात्र, तो पोलिसांना गुंगारा देऊन पसार व्हायचा. तो कात्रज परिसरात आईला भेटण्यासाठी येणार असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला सापळा लावून पकडले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गिरीश दिघावकर, कुलदीप व्हटकर, उपनिरीक्षक धीरज गुप्ता आदींनी ही कारवाई केली.