पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी पुणे शहरातील महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंटच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ हरियाणातील काँग्रेसच्या आमदार आणि प्रसिद्ध कुस्तीपटू विनेश फोगट यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन येथे खेळाडूंच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी विनेश फोगट यांना गदा देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी खेळाडूसोबत संवाद साधताना विनेश फोगट म्हणाल्या की, मी राजकारणात कधी येईन असे मला कधी वाटले नव्हते. मी आता राजकारणात असले तरी आधी खेळाडू आहे. आता राजकारणातील जबाबदारी वाढली आहे. मैदानावर संघर्ष केल्यानंतर महिलांच्या शोषणाविरोधात रस्त्यावर संघर्ष करावा लागला. क्रीडा क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणींना हा त्रास होऊ नये, यासाठी मी संघर्ष करायला तयार आहे. खेळाडूंना चांगल्या दर्जाच्या सोयी-सुविधा मिळाव्या तसेच चांगल्या वातावरणात त्यांना आपला खेळ वाढवता यावा यासाठी मी खेळाडूंबरोबर कायम मैदानात उभी असेन, चांगले शिक्षण आणि प्रशिक्षण दिले तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू देशात घडतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा – येरवड्यातील चार गुंडांना तडीपार करण्याचे आदेश

हेही वाचा – शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणुकीचे प्रकार वाढीस; सायबर चोरट्यांकडून ७५ लाखांची फसवणूक

भाजपने महाविकास आघाडी सरकार पाडले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे दोन पक्ष फोडले. या महायुतीला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. मतदानात मोठी ताकद असून ही ताकद महायुतीला दाखविण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत विनेश फोगाट यांनी महायुतीवर टीका केली.