पुणे : आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारतातून ६६४,७५३.४६ टन पोल्ट्री उत्पादनांची ५७ हून जास्त देशांना निर्यात झाली आहे. त्यांची एकूण किंमत सुमारे १,०८१.६२ कोटी रुपये इतकी आहे, अशी माहिती केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या सचिव अलका उपाध्याय यांनी दिली.
केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाची नवी दिल्ली येथे २३ डिसेंबर रोजी धोरणात्मक बैठक झाली. या बैठकीत माहिती देताना अलका उपाध्याय म्हणाल्या, प्रथिने आणि पौष्टिक अन्नाची गरज म्हणून अंडी आणि ब्रॉयलरला मागणी वाढली आहे. अन्य शेतीमालाच्या उत्पादनात दरवर्षी सरासरी दोन टक्के दराने वाढ होत असताना अंडी आणि ब्रॉयलरच्या उत्पादनात वर्षाला आठ ते दहा टक्क्यांनी वाढ होत आहे. भारत अंडी आणि ब्रॉयलर मांसाचा प्रमुख निर्यातदार देश म्हणून पुढे आला आहे.
हेही वाचा – ठाणे स्थानकात प्रवाशांना घेराव घालून तिकीट तपासणी
या आर्थिक वर्षात भारताने जागतिक बाजारपेठेत मुसंडी मारली आहे. देशातून जगातील ५७ हून जास्त देशांना ६६४,७५३.४६ टन पोल्ट्री उत्पादनाची निर्यात झाली आहे, त्यांचे एकूण मूल्य सुमारे १,०८१.६२ कोटी रुपये इतके आहे. बाजारपेठ संबंधित एका अभ्यासानुसार देशातील पोल्ट्री उद्योगात ३०.४६ अब्ज डॉलर्सची उलाढाल झाली आहे.
पोल्ट्री उद्योग बर्ड फ्ल्यू मुक्त
देशातील पोल्ट्री उद्योग उच्च पॅथोजेनिसिटी एव्हियन इन्फ्लुएंझापासून (बर्ड फ्ल्यू) मुक्त झाला आहे. तशी नोंदणी जागतिक प्राणी आरोग्य संघटनेकडे करण्यात आली आहे. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी जागतिक प्राणी संघटनेनेही त्याला मंजुरी दिली आहे, असेही केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाने म्हटले आहे.
करोनाकाळात वाढला वापर
पोल्ट्री उत्पादनांच्या निर्यातीला चालना देणे. व्यवसायात सुलभता आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. करोनाकाळात रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अन्न म्हणून अंडी आणि ब्रॉयलर मांसाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. बर्ड फ्ल्यूचा धोकाही कमी झाल्यामुळे पोल्ट्री उद्योगाला चांगले दिवस आले आहेत, असेही अलका उपाध्याय म्हणाल्या.