पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रॅप गाणे चित्रीत केल्याच्या प्रकरणाच्या चौकशीसाठी माजी पोलीस महासंचालक डॉ. जयंत उमराणीकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून महिन्याभरात अहवाल सादर करण्याचे निर्देश कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी समितीला दिले.
विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या पार्श्वभूमीवर आणि अंतर्गत भागात चित्रीत केलेल्या सल्तनत या गाण्यात मद्य, पिस्तुल, तलवार अशा साहित्याचा वापर करण्यात आल्याचे निदर्शनास आले. रॅप शैलीच्या या गाण्यात शिव्या आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर असल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुख्य सरचिटणीस आकाश झांबरे पाटील यांनी या गाण्यावर आक्षेप नोंदवत कुलगुरूंकडे लेखी तक्रार नोंदवली. विद्यापीठाने या गाण्याच्या चित्रीकरणासाठी परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी विद्यापीठाकडून पोलिसात तक्रार देण्यात आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली. रॅप गाणे प्रकरणाची विद्यापीठ पातळीवर चौकशी करण्यासाठी माजी पोलीस महासंचालक डॉ. जयंत उमराणीकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या सदस्य बागेश्री मंठाळकर, अधिसभा सदस्य प्रसेनजित फडणवीस, प्रतिष्ठित प्राध्यापक डॉ. चंद्रशेखर चितळे, आजीवन अध्ययन आणि विस्तार केंद्राचे संचालक डॉ. विलास आढाव, उपसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांचा समावेश आहे. सखोल चौकशी करून एका महिन्यात अहवाल सादर करण्याबाबतचे निर्देश कुलगुरूंनी समितीला दिले असल्याची माहिती विद्यापीठाने दिली.