माणसांच्या जगात ‘गाढव’ हा शब्द एखाद्याला कमी लेखण्यासाठी किंवा निर्बुद्ध ठरविण्यासाठी वापरला जात असला, तरी प्रत्यक्षात गाढव या प्राण्याची उपयुक्तता आणि किंमत आजच्या आधुनिक युगातही कमी झालेली नाही. याचीच प्रचिती पौष पौर्णिमा यात्रेनिमित्त जेजुरी येथे भरलेल्या पारंपरिक गाढव बाजारात आली. यंदा बाजारात गाढवांच्या किमती कडाडल्या होत्या. गावरान गाढवांची किंमत ३५ हजारापर्यंत तर गुजरातहून आलेल्या काठेवाडी गाढवांचे दर ४० हजारापासून एक लाखांपार पोहोचले आहेत. बाजारात गाढवे खरेदी करण्यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातून व्यापारी आले होते.
गेल्या तीन दिवसापासून बंगाली पटांगणामध्ये गाढव बाजार भरला आहे. व्यापाऱ्यांनी खरेदी केलेली गाढवे टेम्पो, ट्रक आदी वाहनाने आपल्या गावाकडे नेली. येथील बाजारात हजारो गाढवांची खरेदी-विक्री केली जाते. व्यवहार वायदे बाजारातील व्यापाऱ्यांना लाजवेल असे असतात. खंडोबाच्या साक्षीने अनेक व्यवहार उधारीचे होतात. पुढील वर्षी पैसे देण्याचा शब्द दिला जातो. कोणत्याही प्रकारची लिखापडी न करता आजही हे व्यवहार सुरळीत चालू आहेत. जेजुरीच्या गाढव बाजारासाठी भावनगर आदी भागातील व्यापारी काठेवाडी गाढवे घेऊन येतात. ही गाढवे गावठी गाढवांपेक्षा उंचीपुरी व तरतरीत असतात. यंदा त्यांनी ११० गाढवे आणली होती. भगरी, खारी, पांढरा अशा रंगात ही गाढवे असून एका वेळी ५० ते ६० किलोचा बोजा वाहून नेण्याची त्यांची क्षमता असते. गावरान गाढवांच्या किंमती २५ हजारापर्यंत असतात.
खरेदीसाठी आलेले व्यापारी गाढवांचे दात पाहूनच किंमत बोलतात. आवश्यकता वाटल्यास त्याला पळवत नेऊन शारीरिक चाचणी घेतली जाते. खरेदीसाठी प्रामुख्याने वैदु कोल्हाटी, मदारी, कुंभार, गारुडी व इतर भटक्या विमुक्त समाजातील बांधव येतात. गोरगरिबांच्या पोटाला आधार म्हणून गाढवाकडे पाहिले जाते. गुजरातमध्ये वाऊथा (जि.अहमदाबाद) येथे मोठा गाढव बाजार भरतो. तर महाराष्ट्रात रंगपंचमीला मढी (जि.अ.नगर) सोनोरी (जि.उस्मानाबाद) येथेही पूर्वीच्या प्रथेप्रमाणे बाजार होतात. या बाजारांच्या निमित्ताने भटकंती-भ्रमंती करणारा सारा समाज एकत्र येतो.
हेही वाचा- पुणे : बसथांब्यांवर अनधिकृत जाहिराती लावल्यास गुन्हे, पीएमपी प्रशासनाचा निर्णय
गाढवांची उपयुक्तता आजही
मालवाहतुकीच्या आधुनिक वाहनांमुळे गाढवांचे महत्त्व काही प्रमाणात घटले असले, तरी काही कामांसाठी आताही केवळ गाढवांचाच वापर केला जातो. सध्या प्रामुख्याने वीट भट्टीवर वीट वाहतुकीसाठी गाढवांचा उपयोग केला जातो. उंच डोंगरावर, अडचणीच्या ठिकाणी, खोल डोंगर दरीत, दुर्गम भागात विटा, दगड, माती, खडी, मुरूम, सिमेंट पोती व इतर साहित्य वाहतुकीसाठी गाढवाचा वापर केला जातो. आपण एखादे वाहन खरेदी करताना जशा विविध चाचण्या, पाहणी करून व्यवहार करतो, तशाच पद्धतीने अनेक कसोट्या लावूनच गरजू माणसे गाढवांची खरेदी करतात.
हेही वाचा-
५० विटा वाहून नेणारे गाढव
जेजुरीच्या बाजारात टेंभुर्णी (ता.माण,जि .सोलापूर ) येथील वीट भट्टी व्यावसायिक अनिल शिवाजी माने यांनी १ लाख १० हजार रुपये देऊन काठेवाडी (गुजरात) गाढवाची खरेदी केली. हे गाढव चार वर्षाचे असून देखणे व ताकदवान आहे. त्यामुळेच त्याची खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. याची क्षमता एका वेळी ४० ते ५० विटा वाहून नेण्याची असते.