पुणे : सरकारी कर्मचारी भरती टाळून त्याऐवजी कंत्राटी पद्धतीने भरती करण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक भूमिका घेत लाक्षणिक उपोषण करण्यात आले. सरकारी भरतीमध्ये गैरप्रकार होत आहेत. परीक्षा शुल्कच्या माध्यमातून सरकार विद्यार्थ्यांना लुबाडत आहे. शिक्षणाचे खासगीकरण, स्पर्धा परीक्षा, नोकर भरती, पेपर फुटी अशा घोटाळ्यानंतर सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्यात येत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार रोहित पवार यांनी केला.
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली महात्मा फुले वाडा येथे बुधवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या लाक्षणिक उपोषणाला काँग्रेस, विद्यार्थी अभ्यासिका समिती आणि कष्टकरी युवक संघटनेने पाठिंबा दर्शविला. शहराध्यक्ष प्रशांत जगताप, युवक अध्यक्ष किशोर कांबळे, महिला शहराध्यक्षा मृणालिनी वाणी, युवती अध्यक्ष सुषमा सातपुते, गणेश नलावडे, अजिंक्य पालकर, दीपक कामठे, यांच्यासह अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा >>> काम करण्यास महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची टाळाटाळ… ‘हे’ आहे कारण
कंत्राटी भरतीला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे. ठेकेदारांच्या फायद्यासाठी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण करण्यात येत आहे. तलाठी भरती परीक्षेसाठी शुल्क आकारण्यात आले. मात्र पेपर फोडण्यात आले. त्यामुळे तलाठी भरतीचे शुल्क परत मिळाले पाहिजे. राजस्थान सरकारसारखा कायदा राज्य सरकारने केला पाहिजे आणि परीक्षा घोटाळ्यासंदर्भात समितीकडून चौकशी झाली पाहिजे, अशा मागण्यात रोहित पवार यांनी केल्या.