बचत गटांना व्यवसाय करण्याच्या हेतूने महापालिकेच्या हमीवर बँकेकडून कर्ज देण्याच्या उपक्रमाचा गैरफायदा घेत २० लाख रुपयांवर संगनमताने डल्ला मारण्याचा डाव उघडकीस आला आहे. कर्ज नाकारणाऱ्या दापोडीतील दोन बचत गटांच्या कर्जाची रक्कम परस्पर उचलण्यात आली. बँकेने थकीत रक्कम भरण्याचे पत्र बचत गटांना धाडल्याने हा प्रकार उघड झाला. त्यामुळे या प्रक्रियेतील अनेकजण संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. याप्रकरणी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांनी तक्रार केल्यानंतर आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
दापोडीतील धम्मज्योती व प्रगती या दोन बचत गटांना वेफर्स तयार करण्याची मशीन खरेदी करायची होती. त्यासाठी िपपरीतील बँक ऑफ बडोदा शाखेशी त्यांनी संपर्क साधला व कर्ज मागितले. मात्र, ते कर्ज बचत गटांनी घेतले नाही. मात्र, प्रत्येकी १० लाख याप्रमाणे २० लाखाची रक्कम बँकेतून काढण्यात आली. दोन्ही बचत गटांचे अनुक्रमे सहा लाख व सात लाख रुपये थकल्याचे पत्र बँकेने बचत गटांना पाठवले व थकीत रक्कम भरण्यास सांगितल्याने बचत गटांचे धाबे दणाणले. भांबावलेल्या बचत गटातील महिलांनी सोनकांबळे यांच्या कानावर हा प्रकार घातला. त्यांनी याबाबतची सविस्तर माहिती घेतली व शनिवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा विषय उपस्थित केला. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी आयुक्त प्रकाश कदम यांनी चौकशीचे आदेश दिले.
यासंदर्भात, सोनकांबळे यांनी पत्रकारांना सांगितले, कर्ज मागितले नसताना ते मंजूर कसे झाले. पैसे उचलले कोणी व कोणाकडे थकबाकी मागितली जाते, या प्रकारामागे गौडबंगाल आहे, त्याची आयुक्तांनी चौकशी करावी. समूह संघटक, बँकेचे अधिकारी, मशीनचे ठेकेदार व अधिकारी यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळत नाही, त्या सर्वाचे जबाब घ्यावेत, त्यातून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई व्हावी.