कृष्णा पांचाळ, पिंपरी-चिंचवड
शिवभक्ती काय असते याची प्रचिती शनिवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारसभेत आली. आघाडीचे मावळचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती. भर पावसात सर्व कार्यकर्ते निवारा शोधत पावसापासून आपला बचाव करत असताना एक तरुण मात्र स्टेजवरच थांबला होता. हा शिवभक्त तरुण स्टेजवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याभोवती छत्री घेऊन थांबला होता. या शिवभक्त तरुणाचे नाव शेखर लोखंडे आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवतची छत्री धरुन उभा असलेला त्याचा फोटा लोकसत्ता ऑनलाइनच्या प्रतिनिधींनी आपल्या कॅमेऱ्यात टिपला आहे.
शनिवारी खासदार उदयनराजे भोसले यांची पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ निगडी येथे जाहीर सभा आयोजित केली होती. उदयनराजे येणार असल्याने कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. पदाधिकाऱ्यांची भाषण सुरू झाली तेवढ्यात ढग दाटून आले. काही मिनिटांतच जोरदार पावसाला सुरुवात केली. काही मिनिटं मध्यम स्वरूपाचा पाऊस झाल्यानंतर तो थांबला, पण थोड्या वेळाने पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटसह आणि लखलखाटासह पावसाने हजेरी लावली. सर्व कार्यकर्ते मिळेल त्या निवाराच्या दिशेने धावत होते. स्टेजवरील मंडळी तेथील ताडपत्रीचा वापर करत स्वतःला पावसापासून बचाव करत असल्याचे पहायला मिळालं.
पण शिवभक्त तरुण शेखर लोखंडे तिथेच असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ छत्री धरून पावसापासून संरक्षण करत होता. अर्धा ते पाऊण तास जोरदार पाऊस सुरू होता. पाऊस जाईपर्यंत शेखर लोखंडे तिथून हलला नाही. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.