शाळकरी मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली.
या प्रकरणी महेश ईश्वर मोरे (वय २५, रा. गुलटेकडी) याला अटक करण्यात आली. याबाबत पीडीत मुलीने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. १५ वर्षीय शाळकरी मुलगी, तिचे आई-वडील आणि लहान बहीण एका वसाहतीत राहायला आहेत. मुलीचे आई-वडील दोघेही काम करतात. २८ जुलै रोजी घरात भांडणे झाल्याने मुलगी घराबाहेर पडली. त्या वेळी परिसरातील सुरेश नावाचा एकजण तेथे आला. त्याने तिला मुंबईला नेले. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्याने तिच्या वडिलांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर मुलगी घरी परतली.
मुलगी घरी परतल्यानंतर पोलिसांनी तिची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. तेव्हा तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचे उघडकीस आली. चौकशीत सहा महिन्यांपूर्वी महेश मोरेने बलात्कार केल्याचे तिने सांगितले.
मुलगी शाळेतून घरी आली होती. त्या वेळी घरात कोणी नसल्याचे पाहून महेश मोरेने मुलीवर अत्याचार केले. या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. वैद्यकीय तपासणीत मुलीवर बलात्कार झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करुन गुन्हा दाखल केला.