पुण्यातील वडगावशेरी भागात असलेल्या भंगारच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून तासभरात आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र, आग कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.
अग्निशमन विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव शेरी येथील सोपान नगरमध्ये पाच ते सहा हजार स्क्वेअर फुटमध्ये प्लास्टिकच्या भंगार मालाचे गोडाऊन होते. या गोडाऊनला आग लागल्याची माहिती १२ वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यानुसार काही मिनिटात अग्निशामक १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्याच दरम्यान गोडाऊनमध्ये असलेल्या १० ते १२ सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. आग मोठ्या प्रमाणावर असल्याने चारही बाजूने पाण्याचा मारा करून तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. तर आतील गॅस सिलेंडर बाहेर काढण्यात आले असून ही आग कशामुळे लागली. हे अद्याप सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.