लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: चोरट्याने चक्क देवाच्या मूर्तीचीच चोरी केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. गणेश पेठ येथील शंकराच्या मंदिरातून धातूची मूर्ती चोरीला गेल्याचा प्रकार गुरुवारी (१५ जून) सकाळी साडेसहाच्या सुमारास उघडकीस आला.
गणेश पेठेत असलेल्या शंकराच्या मंदिरात देखभाल करणाऱ्या ६९ वर्षीय नागरिकाने फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा… “पूर्वीचे सरकार ‘घरी’, आम्ही लोकांच्या दारी…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश पेठेत जुने पेशवेकालीन शंकराचे मंदिर असून तिथे पिंड आहे. काही वर्षांपूर्वी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये शंकराची पितळी मूर्ती ठेवण्यात आली होती. वर्षानुवर्षे परिसरातील भाविक या मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. फिर्यादी हे मंदिरातील पूजाअर्चा आणि देखभाल करण्यासाठी कार्यरत आहेत. गुरुवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ते पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये गेले होते. त्यावेळेस देवळीतील शंकराची पितळी सात किलो वजनाची मूर्ती चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मंदिराच्या उघड्या दरवाज्यातून चोरट्याने देवालाच चोरुन नेले अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.