पुण्यातील येरवडा भागात राहणार्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला सावत्र आई आणि वडील हे सतत मानसिक, शारीरिक त्रास देत असायचे. या त्रासाला कंटाळून धावत्या रेल्वेमधून उडी मारून तिने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलीच्या आईचे निधन झाल्यानंतर आरोपी वडिलाने आरोपी सावत्र आईशी लग्न केले. त्यानंतर वडील आणि सावत्र आई हे दोघे मृत मुलीला घरातून बाहेर पडू देत नव्हते. तिला शिक्षण घेऊ देत नव्हते आणि मारहाण करीत होते. या सततच्या त्रासाला मुलगी कंटाळली होती. त्याचदरम्यान सर्व कुटुंबीय गुलबर्गा येथे लग्नासाठी गेले होते. तेथून सर्वजण पुण्याच्या दिशेने रेल्वेमधून प्रवास करीत होते. दौंडपर्यंत रेल्वे आल्यावर मुलीने धावत्या रेल्वेमधून उडी मारली.
या घटनेत मुलाचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मुलीच्या मामाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी वडील आणि सावत्र आईविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू असल्याची माहिती येरवडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक विशाल पाटील यांनी दिली.