लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणात मनोरुग्णालयातील एका रुग्णासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णालयातील परिचारिका आणि सुरक्षारक्षकांनी मुलाला भुलीचे इंजेक्शन दिल्याचे अल्पवयीन मुलाच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी अनिकेत वसंत गोखले (वय २५) याच्यासह परिचारिका, चार सुरक्षारक्षकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोरुग्णालय प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. याबाबत मुलाच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा… पिंपरीतील ‘त्या’ हत्येसाठी अल्पवयीन मुलांना दिले पिस्तुल चालवण्याचे प्रशिक्षण; तपासात गंभीर बाब उघड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी बाल सुधारगृहात होता. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याने त्याला मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. संशयित आरोपी गोखले याला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. कारागृहात त्याची मानसिक स्थिती बिघडल्याने त्यालाही मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेले दीड वर्ष गोखलेवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा… कोंढव्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेचा छापा, एक संशयित ताब्यात
पीडित मुलाला उपचारानंतर सोडण्यात आले. त्यानंतर त्याची आई त्याला कोल्हापूर येथील शाळेत प्रवेश घेण्यासाठी घेऊन गेली होती. तेथे त्याने डावा हात दुखत असल्याची तक्रार केली. त्यामुळे आईने त्याला डॉक्टरांकडे नेले आणि मुलाच्या हाताचा एक्स रे काढला. तेव्हा त्याच्या हातावर १८ ठिकाणी सुया टोचल्याचे व्रण दिसून आले. प्रादेशिक मनोरुग्णालयातील परिचारिका आणि सुरक्षारक्षकांनी इंजेक्शन दिल्याने हाताला दुखापत झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.
हेही वाचा… पुण्यातील कट्टर प्रतिस्पर्धी आता एकत्र
मुलाची चौकशी करण्यात आली. तेव्हा अनिकेत गोखले याने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलाच्या आईने येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक सुरेखा गाताडे तपास करत आहेत.