पुणे: प्रवासी वाहतूक करणाऱ्या मोटारचालक तरुणाला मारहाण करुन लुटण्यात आल्याची घटना लोहगाव विमानतळ परिसरात घडली. प्रतीक रणवरे (वय २२, रा. येवलेवाडी, कोंढवा) याने याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी चोरट्यांच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. रणवरे ॲप आधारित प्रवासी वाहतूक करतो. माेटारचालक रणवरे रात्री प्रवासी वाहतूक करणाऱ्या थांब्याकडे निघाला होता. त्या वेळी चोरट्यांनी त्याला अडवले. मोटार नीट चालविता येत नाही का?, अशी विचारणा करुन चोरट्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा >>> पुणे: वीज मीटर बसवून देण्याच्या अमिषाने फसवणूक; न्यायालयाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश

चोरट्यांनी रणवरे याच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. मोटारीत ठेवलेली रोकड लुटून चोरटे पसार झाले. या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास विमानतळ परिसरात प्रवासी वाहतूक करू दिली जाणार नाही, अशी धमकी देऊन चोरटे पसार झाले. चोरट्यांनी केलेल्या मारहाणीत रणवरे जखमी झाला. रुग्णलायात उपचार घेऊन त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक वाकडे तपास करत आहेत.