पुणे : भरधाव महागड्या लॅम्बोर्गिनी मोटारीच्या धडकेने मृत्युमुखी पडलेल्या श्वानाला अखेर न्याय मिळाला. डेक्कन जिमखाना येथील गोखले चौकात लॅम्बोर्गिनी मोटारीने श्वानाला फरफटत नेले होते. या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी मोटारचालकास अटक केली आहे. मोटारीच्या मालकीची नोंद एका सराफी व्यावसायिकाच्या नावावर असल्याचे उघडकीस आले आहे.
या बाबत एका प्राणीप्रेमी कार्यकर्त्याने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. डेक्कन जिमखाना भागात वास्तव्यास असलेल्या एका सराफ व्यावसायिकाने दोन वर्षांपूर्वी महागडी मोटार खरेदी केली होती. महागडी मोटार भरधाव वेगाने चालवित असल्याप्रकरणी नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. तीन दिवसांपूर्वी गोखले चौकात (गुडलक चौक) भरधाव महागड्या मोटारीने ‘डॉन’ नावाच्या श्वानाला फरफटत नेले होते. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी टिपली होती. प्राणीप्रेमींनी चित्रीकरण पोलिसांना दिले होते. त्यानंतर डेक्कन परिसर समितीच्या डॉ. सुषमा दाते यांनी मोटार चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्याच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर डेक्कन पोलिसांंनी रविवारी मोटारचालकाला अटक केली असून, त्याची मोटार जप्त करण्यात आली.