इंदापूर : आपल्या कौशल्याने आणि अविरत प्रयत्नाने घरटी बनवण्यात पटाईत असलेल्या ‘सुगरण’ पक्ष्यांनी आता, बहुमजली घरटी बनवण्यास सुरुवात केलेली आढळून येत आहे.

सुगरण पक्ष्यातील नर पक्षी हा प्रथमतः आपले घरटे बनवण्यास सुरुवात करतो. जे घरटे अत्यंत सुंदर सुबक असेल अशा घरट्यामध्ये ते घरटे पसंत करून मादी पक्षी प्रवेश करते .मग ही मादी तिच्या कौशल्याने व नियोजनाने घरट्यामध्ये पक्ष्यांची पिसे, मऊ कपड्यांचे तुकडे ,पडलेला कापूस घेऊन मऊ व उबदार गालिचा तयार करून एकदम वरच्या कप्प्यात अंडी घालते. आणि या नव्या घरट्यामध्ये सुगरण पक्ष्यांचा संसार सुरू होतो.

ही घरटी विहिरीजवळ असलेल्या झाडाच्या व विहिरीकडे झुकलेल्या टांगत्या फांदीला,तलावाच्या बाजूला झुकलेल्या फांदीला, नदीकाठावरील झाडावर जेणेकरून सहजासहजी कोणाला शत्रूला घरट्यापर्यंत पोहोचता येणार नाही. याची काळजी घरटे बांधतानाच घेतलेली दिसते .

सर्वसाधारणपणे एक कप्पा, दोन कप्पे असलेल्या घरट्यांमध्येही विविध प्रकार,व आकार आढळून येत असत. पक्षी निरीक्षक व निसर्गप्रेमी या घरट्यांकडे कलाकुसरीने पाहत असतात . सुगरण पक्ष्यांच्या घरट्यांचे विणकाम पाहणे पक्षी निरीक्षकांना एक पर्वणीच असते.

सुगरण पक्ष्यातला नर पक्षी हा प्रामुख्याने घरटी विणण्याचे काम करीत असतो. ही घरटी बनवताना सतत कार्यमग्न आढळतो.

हे घरटे बनवताना विविध ठिकाणावरून गवत आणताना, आपल्या चोचीमध्ये धरून विणत असताना, गवताची पाती- काड्या अनेक वेळा या पक्ष्यांच्या तोंडाला चोचीला टोचत असतात. त्यातून या पक्ष्यांच्या तोंडाला जखमाही होतात. परंतु वेळेत घरटं पूर्ण करून हा पक्षी आपल्या जोडीदारणीची वाट पाहतो. असे निरीक्षण पक्षी निरीक्षकांचे आहे.

आता या सुगरण पक्ष्यांनी तीन कप्पे असलेली घरटी बनवायला सुरुवात केलेली आढळून येत आहे. अशी सुबक व बहुमजली घरटी पाहणे ,आता पक्षी निरीक्षकांना व पर्यावरण प्रेमींना निरीक्षणाची नवी पर्वणीच निर्माण झाली आहे.
         
अरे, खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला .
देखा, पिलासाठी तिनं  झोका झाडाले टांगला…
पिलं निजली खोप्यात जसा झुलता बंगला ,
तिचा पिलामधी जीव, जीव झाडाले टांगला…
  
कवी बहिणाबाई चौधरी यांनी सुगरण पक्ष्यांच्या घरट्याची दखल घेत रचलेली कविता किती सार्थ आहे. याचा प्रत्यय सुगरण पक्ष्यांची आपले  घरटे बांधण्यासाठी असलेली कसरत पाहून आजही येतो.

मृग नक्षत्राच्या समाधानकारक सरी कोसळल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असतानाच, तेवढाच उत्साह घेऊन सुगरण पक्षी आपले घरटे बांधण्यास सुरुवात करतो .

गावोगावच्या शिवारात, पावसाळा सुरू होताच शेतकरी शेतीच्या कामात मग्न झालेला असतानाच निसर्गातील सुगरण उर्फ बाया, विणकर अशी त्याची नावे असलेला ‘सुगरण’ पक्षी आपले स्वप्नातले  घरटे बांधण्यात मग्न दिसतो.

पावसापासून आपल्या पिल्लांचे संरक्षण करण्यासाठी घरटे बांधण्यात आपला पूर्णवेळ व कौशल्य वापरून मनातलं घर साकार करण्यासाठी सुगरण पक्ष्यांची धांदल पहाण्यासारखी असते.गवताची एक- एक काडी जमवून आपले घरटे पुर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असतो. आता तर या सुगरण पक्ष्यांनी आपल्या घरट्यांमध्ये सुधारणा करीत बहू मजली घरटी आढळून येत आहेत.

Story img Loader