नारायणगाव : अज्ञात वाहनाच्या धडकेत नऊ वर्ष वयाच्या नर बिबट्याचा मृत्यू झाला. नारायणगाव येथील माजी उपसरपंच संतोष वाजगे यांच्या शेतालगत साई मल्हार हॉटेल समोर रविवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
वाहनाच्या धडकेत नऊ वर्षाचा बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच उपवनसंरक्षक अमोल सातपुते आणि वनक्षेत्रपाल प्रदिप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिता होले, बिबट रेस्क्यू टीम सदस्य किरण वाजगे, नारायणगावचे पोलीस पाटील सुशांत भुजबळ, माजी उपसरपंच संतोष वाजगे, वन कर्मचारी खंडू भुजबळ, हर्ष भास्कर, पुष्कराज तांबे, दर्पण पवर, विपुल कोल्हे, आदित्य डेरे घटनास्थळी दाखल झाले. रस्त्याच्या मध्यभागी बिबट्या मरून पडल्यामुळे काही वेळ तेथे वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक नागरिकांनी या बिबट्याला उचलून वाहनात ठेवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.