पुणे : गेल्या काही वर्षांत ‘मेडिकल टूरिझम’चे भारत हे महत्त्वाचे केंद्र झाले आहे. त्यामुळेच २०२०च्या तुलनेत २०२१मध्ये वैद्यकीय कारणांनी भारतात आलेल्या परदेशी नागरिकांची संख्या जवळपास दुप्पट झाल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच २०२१ मध्ये भारतात आलेल्या एकूण परदेशी पर्यटकांची संख्याही घटल्याचे स्पष्ट झाले.
केंद्रीय पर्यटन विभागाने जाहीर केलेल्या ‘इंडिया टूरिझम २०२२’ या अहवालातून ही माहिती समोर आली. करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर जगभरात प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आल्याने पर्यटनावर मोठा परिणाम झाला. २०१९मध्ये १ कोटी ९ लाखांहून अधिक, २०२० मध्ये २७ लाख ४४ हजार दशलक्ष परदेशी नागरिक पर्यटक भारतात आले होते. तर २०२१ मध्ये १५ लाख २७ हजार दशलक्ष परदेशी नागरिकांनी भारताला भेट दिली. त्यामुळे भारतात आलेल्या एकूण परदेशी नागरिकांची संख्याही कमी झाल्याचे दिसून येते. भारताला भेट दिलेल्या परदेशी नागरिकांमध्ये अमेरिका, बांगलादेश, नेपाळ, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, पोर्तुगाल, फ्रान्स, मालदीव, श्रीलंका, रशिया, इराक आणि नेदरलँड या देशातील नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
परदेशी नागरिक पर्यटनासह उद्योग-व्यवसाय, वैद्यकीय अशा विविध कारणांनी भारतात येत असतात. त्यामुळे वर्षभरात वैद्यकीय कारणांनी भारतात आलेल्या पर्यटकांची दुप्पट झालेली संख्या लक्षणीय आहे. २०२०मध्ये १ लाख ८२ हजार ९४५ परदेशी नागरिक वैद्यकीय कारणांनी भारतात आले होते. २०२१मध्ये ३ लाख ३ हजार ५२६ परदेशी नागरिक वैद्यकीय कारणांनी भारतात आल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
देशांतर्गत पर्यटनामध्ये वाढ..
अहवालात दिलेल्या माहितीनुसार २०२०च्या तुलनेत २०२१मध्ये देशांतर्गत पर्यटकांची संख्या वाढली. २०२०मध्ये ६१० दशलक्ष पर्यटक, तर २०२१मध्ये ६७७ दशलक्ष पर्यटकांची नोंद झाली.
महाराष्ट्राला पसंती ..
देशात पंजाब आणि महाराष्ट्राला परदेशी पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळाली. २०२१मध्ये ३ लाख ८ हजार परदेशी पर्यटकांनी पंजाबला, तर १ लाख ८५ हजार पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट दिल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
वैद्यकीय कारणांनी भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्या करोनापूर्व काळाइतकी अद्याप झालेली नाही. करोनापूर्व काळात वैद्यकीय कारणांनी भारतात येणाऱ्या परदेशी नागरिकांची संख्या बरीच जास्त होती. २०२०मध्ये करोनामुळे एकूणच प्रवासावर निर्बंध होते. ते टप्प्याटप्प्याने शिथिल होत गेले. त्यामुळे गेल्या वर्षभरात वैद्यकीय कारणांनी भारतात आलेल्या परदेशी नागरिकांची संख्या वाढत आहे.
– हृषीकेश खांदवे, उपमहाव्यवस्थापक, मेडिकल टूरिझम विभाग, रुबी हॉल क्लिनिक