डॉ. सुधीर मेहता, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पिनॅकल इंडस्ट्रीज

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मला कायमच उत्पादन क्षेत्रातील मोठ्या संधी खुणावतात. या क्षेत्रात मोठ्या समूहाला जगण्याचा आधार मिळवून देण्याची क्षमता आहे. याचबरोबर अनेकांच्या आयुष्यात नवीन गोष्टींची निर्मिती करण्याची, नावीन्य आणण्याची आणि सहभागी होण्याची संधी या क्षेत्रामुळे मिळते. त्यातून अर्थव्यवस्थेत वाढ होण्यासोबत व्यवसाय वृद्धीही होत असते. वाहननिर्मिती क्षेत्रात कार्यरत असलेल्या भारतीय आणि जागतिक कंपन्यांना एकाच ठिकाणी वाहनांची आसन व्यवस्था आणि अंतर्गत रचना उत्पादने पुरविणारी कंपनी सुरू करण्याचा माझा पहिल्यापासून मानस होता.

अमेरिकेत वास्तव्यास असताना मी नेहमी भारतात परतण्याचा विचार करीत असे. माझ्या व्यावसायिक कारकीर्दीत भर टाकण्यासोबत भारताच्या विकासात योगदान देण्याची इच्छा मला होई. याला कारण, म्हणजे माझा जन्म दिल्लीतील. मी अमेरिकेतील डपॉऊ विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्स अँड इकॉनॉमिक्समध्ये पदवी मिळवली. त्यानंतर शिकागो विद्यापीठातून फायनान्स व इंटनॅशनल बिझनेसमध्ये व्यवस्थापनशास्त्राची पदवी घेतली. माझ्या व्यावसायिक कारकीर्दीची सुरुवात अमेरिकेत १९९२-९३ मध्ये एका मोठ्या वित्तीय संस्थेतून झाली. तिथे इन्व्हेस्टमेंट बँकर आणि सल्लागार म्हणून मी काही वर्षे काम केले. त्यानंतर मी भारतात इंदोरमध्ये परत आलो.

हेही वाचा : वर्धापनदिन विशेष: ध्यासमग्न उद्योगपती : रवी पंडित

पिनॅकलची सुरुवात १९९६ मध्ये मध्य प्रदेशातील पीथमपूर येथून झाली. मेटाडोरसाठी आसनव्यवस्था बनविण्यापासून सुरुवात केल्यानंतर आम्ही उत्पादन क्षमतेचा विस्तार केला. अनेक नवीन उत्पादने आणि उत्पादन प्रकल्प सुरू केले. आयसीई आणि इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) क्षेत्रातील वाहन उत्पादक कंपन्यांना सर्व प्रकारच्या भागांचा पुरवठा करणारी आमची एकमेव कंपनी आहे. सर्व प्रकारच्या व्यावसायिक वाहनांसाठी केवळ आसन व्यवस्था न बनविता वाहनांसाठी लागणाऱ्या सर्व भागांची निर्मिती करणे हे आमचे उद्दिष्ट होते. आम्ही हा प्रवास सुरू ठेवत असतानाच विशेष वाहने, रुग्णवाहिका, ईव्हीचे सुटे भाग आणि आता वंदे भारत रेल्वे गाड्यांची आसन व्यवस्था असा व्यवसाय विस्तार केला.

आजच्या घडीला देशातील ७० ते ८० रुग्णवाहिकांमध्ये पिनॅकल इंडस्ट्रीजचे किमान एक तरी उत्पादन वापरलेले दिसते. आपत्कालीन वैद्याकीय वाहतूक ही अतिशय महत्त्वाची असून, देशपातळीवर त्यात वाढ करण्यासाठी पावले उचलायला हवीत. कारण आपत्कालीन वैद्याकीय वाहनव्यवस्था नसल्याने कोट्यवधी नागरिकांच्या जीवावर बेतत आहे. मला अतिशय अभिमानाने सांगावेसे वाटते की सर्व प्रकारच्या वाहनांमध्ये रुग्णवाहिका निर्माण करून देणाऱ्या अतिशय मोजक्या कंपन्यांपैकी आम्ही एक आहोत.

सध्या केवळ काही मोजक्या कंपन्यांची मक्तेदारी असलेल्या वाहननिर्मिती आणि उत्पादन क्षेत्रात जास्तीतजास्त घटकांना संधी निर्माण करणे, हाच माझा आतापर्यंतच्या प्रवासाचा आणि ज्ञानाचा हेतू राहिला आहे. देशातील आघाडीची व्यावसायिक वाहन निर्माती कंपनी फोर्स मोटर्स आणि जर्मनीतील मॅन ट्रक अँड बस एजी यांच्यासोबत संयुक्तपणे मी मॅन फोर्स ट्रकची २००२ सुरुवात केली. ही कंपनी नंतर २०१२ मध्ये मॅनला विकण्यात आली. त्यावेळी कंपनीचे मूल्य ७० कोटी डॉलर (१२ पट परतावा) होते. देशातील ट्रक बाजारपेठेत आमचा हिस्सा ५ टक्क्यांवर पोहोचला होता. मॅन फोर्समध्ये मला देशभरात विक्री आणि सेवांचे जाळे उभारण्यास आणि २० देशांमध्ये निर्यात करण्यास मदत करता आली.

हेही वाचा : वर्धानपनदिन विशेष : पुणे शहराच्या राजकारणाचा अंतरंग

नंतर २०१५ ते २०२१ या कालावधीत माझा मोर्चा शाश्वतता आणि ठिबक सिंचनाकडे वळला. रिवुलीस इरिगेशन इस्राईल या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी आधी एफआयएमआय (इस्राईलमधील सर्वांत मोठी गुंतवणूक कंपनी) आणि नंतर सिंगापूरमधील टेमासेकसोबत भागीदारी केली. ही कंपनी ६ वर्षांत ६ कोटी डॉलरवरून ३५ कोटी डॉलरवर नेण्यास माझी मदत झाली. कंपनीने या क्षेत्रात अमेरिका आणि युरोपमधील बाजारपेठेत मोठा हिस्सा काबीज केला. नंतर कंपनीचा भारतात विस्तार करण्यात आला. भारतात ही कंपनी २० लाख डॉलरवरून २.५ कोटी डॉलरवर पोहोचली आणि त्यातून कंपनीचे एकूण मूल्य ४० कोटी डॉलरवर पोहोचले.

स्पेनमधील आघाडीच्या उद्याोगसमूहाच्या मालकीची व रिटेल स्टोअर फिटिंग्जमधील किडर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी मी २०१४ मध्ये ताब्यात घेतली. सध्या इनस्टोर किडर इंडिया ही रिटेल आणि इंडस्ट्रीयल फिक्स्चर्समधील देशातील आघाडीची उत्पादक व निर्यातदार कंपनी आहे. किराणा दुकानांपासून आघाडीच्या भारतीय व जागतिक रिटेल ब्रँडना इनस्टोर इंडिया सर्व प्रकारची सोल्यूशन्स पुरवत आहे. माझ्या सर्वांत महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये नेदरलँडमधील व्हीडीएल ग्रुप आणि पिनॅकल इंडस्ट्रीजने २०१६ मध्ये स्थापन केलेली व्हीडीएल पिनॅकल इंजिनिअरिग इंडिया ही कंपनी. व्हीडीएल ग्रुप १९ देशांमध्ये कार्यरत असून, त्यांच्या १०० हून अधिक कार्यरत कंपन्या आहेत आणि त्यात १६ हजारांहून अधिक कर्मचारी आहेत. व्हीडीएल ग्रुपच्या अभियांत्रिकी सेवांना पाठबळ देण्यासाठी डिझाईन आणि इंजिनिअरिंग हाऊस म्हणून ही कंपनी सुरू झाली. आता व्हीडीएल पिनॅकल ही कंपनी वाहन उद्याोगाला संपूर्ण उत्पादन व्यवस्था पुरवठादार बनली आहे. ती व्हीडीएलच्या जागतिक कार्यालये आणि प्रकल्पांना बस व कोचच्या ऑटोमेशन सिस्टीम्स, बॉडी-इन-व्हाईट टूलिंग लाईन्स आणि उत्पादन रचनेसाठी पाठबळ पुरवत आहे. विशेष म्हणजे, व्हीडीएल पुणेस्थित कंपनी आहे. नावीन्यता हा माझ्या प्रत्येक कामातील भाग राहिला आहे. त्यातूनच २०१९ मध्ये मी ‘एका’ कंपनीची स्थापना केली. मित्सुई (जपान) आणि व्हीडीएल ग्रुप (नेदरलँड) यांच्यासोबत भागीदारी करून ही आघाडीची इलेक्ट्रिक वाहन व तंत्रज्ञान कंपनी सुरू करण्यात आली. जागतिक पातळीवर मोठ्या उद्याोगांसोबत भागीदारी करणारी ही एकमेव ईव्ही कंपनी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. भारतीय उत्पादन कंपनी जागतिक पातळीवरील मानके केवळ भारत नव्हे तर जगासाठी देत असल्याबद्दलचा विश्वास या सहकार्यातून दिसतो. एका म्हणजे एकत्र राहणे आणि एक बनणे. आम्ही सगळे आपल्या पर्यावरणासाठी एकत्र आलो असून, नवीन तंत्रज्ञान, संकल्पना आणि प्रक्रिया याचा वापर व्यवसाय वृद्धीसाठी करीत असताना आमचा मुख्य भर पर्यावरण, सजग नावीन्यता आणि विश्वासू वहनशीलता यावर आहे. आमची संकल्पना ही मेड इन इंडिया भारतासाठी आणि जगासाठी अशी असून, त्यामुळे भारतकीएका असे आम्ही संबोधत आहोत.

हेही वाचा : डॉ. प्रमोद चौधरी ‘प्राज’पर्वाचे प्रवर्तक

इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन क्षेत्रात जागतिक पातळीवर नेतृत्व करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. व्यावसायिक इलेक्ट्रिक वहनशीलतेमध्ये परिसंस्था तयार करून त्याद्वारे शहरे वाहतूक कोंडीमुक्त करणे, सार्वजनिक आणि व्यावसायिक वाहतूक आरामदायी व नफा मिळविणारी बनवणे हा आमचा हेतू आहे. यातून नागरिकांचे आयुष्य सुखकर होण्यासोबत पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि सरकारी खर्च कमी होईल. भारतीय ईव्ही क्षेत्रात बौद्धिक संपदेबाबतही आम्ही आघाडीवर आहोत. अनेक सामाजिक उपक्रमातही माझा सहभाग असतो. बीएमव्हीएसएस-जयपूर फूट संस्थेचा मी सचिव आहे. ही जगातील सर्वांत मोठी कृत्रिम पाय बसविणारी संस्था असून, आतापर्यंत २० लाख जणांना कृत्रिम पाय बसविण्यात आले आहेत. पुण्यातील महत्त्वाच्या समस्या सोडविण्यासाठी सुरू झालेल्या पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोविड/कोलॅबरेटिव्ह रिस्पॉन्स (पीपीसीआर) या संस्थेचे मी नेतृत्व करीत असून, तिचा समन्वयकही आहे. माझा प्रवास आता थांबलेला नाही.

भविष्याकडे पाहताना मी पुढील धाडसांबद्दल उत्साही आहे. माझे कुटुंबीय, मित्र आणि सहकाऱ्यांच्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. माझा हा प्रवास इतरांना मोठी स्वप्ने पाहण्यास आणि ध्येयपूर्तीसाठी प्रेरणादायी ठरेल. यापुढेही राष्ट्रउभारणी, आर्थिक विकासाला हातभार लावणे, स्वयंउद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि नवीन सामाजिक संकल्पनांच्या माध्यमातून कार्यरत राहण्याची माझी इच्छा आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A passion for innovation in vehicle manufacturing dr sudhir mehta pinnacle industries pune print news css
Show comments